आदित्य ठाकरेंचा ‘तो’ पूल गेला वाहून; महिलांची पुन्हा पाण्यासाठी जीवघेणी कसरत

नाशिक : जिल्ह्यातील हरसूल तालुक्यातील शेंद्रीपाडा या आदिवासी भागात उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणीटंचाईमुळे महिलांना लाकडी ओंडक्यावरून तीस फूट खोल नदी पार करून पाणी आणण्यासाठी जीवघेणी पायपीट करावी लागत होती. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची तात्काळ दखल घेत. त्याठिकाणी लोखंडी पूल बांधून दिला होता. मात्र मागील आठवड्यात हरसूल तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यातून छोट्या- मोठ्या सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बांधून दिलेला पुलही यावेळी पाण्याखाली गेला. पाण्याचा जोर इतका होता की त्यात तो पूल वाहूनच गेला. पूल वाहून गेल्यानं पुन्हा एकदा या पाड्यांवरील महिलांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी लाकडी ओंडक्याचा आधार घ्यावा लागत आहे.

तीन महिन्यात पाणी योजनेच दिल होत आश्वासन

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी त्या पुलाची बांधणी झाल्यावर शेंद्री पाड्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आजूबाजूच्या सर्व गावांत तीन महिन्यांच्या आत पाणीपुरवठा योजना राबवून पाण्यासाठीची पायपीट दूर करू असे आश्वासन दिलं होतं. मात्र तसे काही घडलेच नाही. अति पर्जन्यमानाचा भाग असूनही या भागात पिण्याच्या पाण्याच नेहमीच दुर्भिक्ष असत.