घरमहाराष्ट्र"नामांतराचा निर्णय घेताना गद्दार तिथे नव्हते"; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल

“नामांतराचा निर्णय घेताना गद्दार तिथे नव्हते”; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल

Subscribe

अखेर औरंगाबाद आणि धाराशिवच्या नामांतरणाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. पण आता यासाठी श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. उद्या चंद्रावर रॉकेट पाठवला तरी त्याचे श्रेय हे सरकार घेईल, असा टोला यावेळी आदित्य ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांना लागवण्यात आला आहे.

केंद्राकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असताना शेवटच्या क्षणाला त्यांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन हा प्रस्ताव पुढील मंजुरीकरता केंद्रात पाठवला. पण महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने नामांतराचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठविण्यात आला. पण आता याला मंजुरी देण्यात आल्याने सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा श्रेयवाद सुरु झाला आहे.

नाशिक येथे ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे सरकार चंद्रावर रॉकेट पाठविण्याचे पण श्रेय घेऊ शकतात. नासाचे पण श्रेय घेऊ शकतात. तर त्यांना त्याच्यात खुश राहुद्यात,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

नामांतर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्याप्रमाणे आता ते झाले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय घेताना हे गद्दार तिथे नव्हते. हे घाबरट गुवाहाटीला पळून गेले होते. तेव्हा हा निर्णय आमच्याकडून घेण्यात आला होता आणि आता या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. महत्वाची बाब म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे दंगली झाल्या नाहीत, वाद झाले नाहीत म्हणून या गद्दारांच्या पोटात दुखत आहे असे बोलत हल्लाबोल केला.

हेही वाचा – भाजप विरोधात देशातील सर्व पक्ष एकत्रित येण्याची ही सुरूवात : छगन भुजबळ

- Advertisement -

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यावेळी इतर गोष्टींवर देखील भाष्य केले. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्य सरकारने कॅबिनेट देखील रद्द केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तर कसबा पेठ मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पोलिसांच्या मदतीने मतदारसंघात पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यात राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होईल का? आपली लोकशाही टिकून राहणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केल्याचे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आधीपण बोललो होतो धर्मामध्ये, जातीमध्ये, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजायचे काम हे लोक करत आहेत. त्यामुळे याकडे कोणीही लक्ष देऊ नका, असेही आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -