आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला पूल मुख्यमंत्री शिंदे उभारणार

प्रशासन अधिकार्‍यांकडून परिस्थितीची पाहणी; सोमवारपर्यंत 1500 किलोचा नवीन पूल

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेंद्रीपाडा येथील तास नदीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उभारलेला पूल वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकार्‍यांना तातडीने पूल उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.22) पूलाची पाहणी करत याच जागेवर नवीन पूल सोमवार (दि.26) पर्यंत उभारण्यात येणार आहे.

सावरपाडा आणि शेंद्रीपाडा या दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या वस्त्यांवरील महिलांना लाकडी बल्ल्यांवरून जीवघेणा कसरत करावी लागते. त्यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या व्हिडिओंची दखल घेऊन युवा सेनेच्या माध्यमातून तेथे पूल उभारण्याचा खर्च उचलला होता. तेव्हा जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निधीतून ११७५ किलो वजनाचा लोखंडी पूल उभारला; मात्र, त्याची रक्कम युवासेनेने दिली होती. त्या पुलाच्या बांधकामाचे श्रेय घेत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या पुलाची पाहणी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

जुलैमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दमणगंगेच्या तासावरील तो पूल वाहून गेला. दरम्यान पूल वाहून गेल्यामुळे त्या पुलाच्या जागेवर पु्न्हा लाकडी बल्ल्या टाकून महिला ये जा करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकार्‍यांनी त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे आदींनी प्रत्यक्ष जाऊन वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यांनी वाहून गेलेल्या पुलाचा शोध घेतला. दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात त्याचा सांगाडाही सापडला नाही. त्यानंतर त्यांनी नवीन पुलाचे अंदाजपत्रक तयार करून त्याचे कामही संबंधित व्यावसायिकाला दिले आहे. यावेळी १५०० किलो वजनाचा पूल बनवला जाणार असून बांधकाम विभागाच्या मदतीने त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निधीतून उभारला जाणारा नवीन पूल सोमवार (दि.२६) पर्यंत तयार होणार असल्याने त्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे सांगण्यात आले.

जुन्या पुलाच सांगाडाही मिळेना

तासनदीवर उभारलेला ११७५ किलो वजनाचा पूल वाहून गेल्यानंतर पुढच्या दोन-तीन किलोमीटर परिसरातही तो आढळून आला नाही. यामुळे हा पूल कोठे गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूलाचे एवढे वजन असूनही वाहून गेलेला पूल आजूबाजूला कोठेही सापडत नाही. मात्र, त्याच पुलाच्या खालच्या बाजूला मासे पकडण्याचे जाळे लावण्यासाठी उभारण्यात आलेले लाकडी खांब या महापुरातही तग धरून आहेत, मग लोखंडी सांगाडा गेला कुणीकडे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.