परवानगीविना सुरूये आधारतीर्थ आश्रमाचा कारभार

नाशिक : आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा खून झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी भेट दिली. या भेटीत आधारतीर्थ आश्रमाने बालकल्याण विभागाची परवानगी न घेता सुरू असल्याचे समोर आले.

आधारतीर्थ आश्रमात सोमवारी रात्री आलोक शिंगारेचा खून झाल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागा झाल्या. दोन दिवसांमध्ये शासकीय यंत्रणांच्या अधिकार्‍यांनी आश्रमास भेट देत पाहणी केली. बुधवारी सकाळी महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी भेट दिली. त्यानंतर नाशिक महिला व बालकल्याण समितीच्या पथकाने येथे भेट दिली. या भेटीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर पंचायत समिती महिला व बालकल्याण विभागाने देखील या अनाथालयाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. येथे असलेल्या बालकांची माहिती घेणे अनिवार्य आहे. मात्र, आश्रमात बालकांचे लसीकरण कुपोषणाबाबत अनभिज्ञता दिसून येत आहे. येथे पौगंडावस्थेतील मुलेमुली आहेत. त्यांच्याबाबत देखील समुपदेशन करणे आवश्यक आहे.

व्यवस्थापकांशी चर्चा केली असता साई श्रध्दा चॅरेटेबेल संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. त्यावर विश्वस्त म्हणून ठाणे,मुंबई परिसरातील व्यक्ती आहेत. अंजनेरी ग्रामपंचायतीअंतर्गत हा आश्रम येतो. मात्र अंजनेरी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आधारतीर्थ आश्रम आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलामुलींसाठी आहे. मात्र, या ठिकाणी शेतकर्‍यांसह इतर पालकांची मुलेमुली आहेत. त्यामुळे आश्रमाच्या नावाने आणखी काही प्रकार सुरु आहेत का, याची चौकशी करावी अशी मागणी पेगलवाडी नाशिक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांनी केली आहे.