वंचितला युती किंवा आघाडीचे पर्याय खुले, अॅड. प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय

Adv. Prakash Ambedkar said Vachit Bahujan is open to lead with any party
Adv. Prakash Ambedkar said Vachit Bahujan is open to lead with any party

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युती किंवा आघाडी करण्याबाबत राज्य कार्यकारणीसमोर एक महत्वाची भूमिका मांडली आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षासोबत युती किंवा आघाडी करण्याबाबत जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून राज्य कार्यकारणीसमोर प्रस्ताव ठेवावा. त्यावर निर्णय घेता येईल अशी भूमिका मांडली आहे. या भूमिकेमुळे वंचित आघाडीला युती किंवा आघाडीचे पर्याय खुले झाले आहेत.

पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पक्ष महाराष्ट्रात नव्या जोमाने सर्व निवडणुका लढवणार आहे, असे रेखा ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

पक्षाच्या सभासद नोंदणीवर, ‘प्रबुद्ध भारत’च्या नोंदणीवर भर देण्यावर चर्चा झाली. पक्ष संघटनात्मक ऊर्जा व नियोजन यांची सांगड घालून पक्ष रचनात्मक काम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या भानगडीत महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित होत आहेत. याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष द्यायला तयार नाहीत. महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे हाल झाले असून तरुणांना दिशाहीन केले जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मजबुतीने लढण्याचा निर्धार बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.