Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'अफगाणी' झरीफ बाबाची हत्या संपत्तीसाठीच चार मारेकरी गजाआड

‘अफगाणी’ झरीफ बाबाची हत्या संपत्तीसाठीच चार मारेकरी गजाआड

Subscribe

आठ दिवसांत छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश; आणखी दोन संशयितांच्या शोधार्थ पथके कायम

४ वर्षात कोट्याधीश; पण संपत्तीमुळेच अंत

झरीफ बाबाने भारतात आल्यानंतर आजवर चार वर्षांत तीन कोटींची संपत्ती कमावली. अफगाण निर्वासीत असल्याने बाबाला भारतात संपत्ती घेणे वा कुठलाही आर्थिक व्यवहार करणे शक्य नव्हते. परिणामी, बाबाने चालक आणि जवळच्या काही चेल्यांच्या नावावर संपत्ती घेतली. यूट्युब, फेसबूक, इन्टाग्राम अशा सोशल मीडिया माध्यमांद्वारे लाखो फॉलोअर्सच्या माध्यमातून बाबाच्या पुंजीत महिन्याकाठी कित्येक लाखांनी भर पडत होती. धार्मिक मार्गदर्शन आणि सिनेस्टार्सची जवळीक दाखवून बाबा फॉलोअर्स वाढवत होता. शिवाय धार्मिक कार्यक्रमांच्या नावे देणग्याही जमवत होता. मात्र, हीच संपत्ती बाबाच्या मृत्यूचे कारण ठरली. मुळात बाबाच्या जीवाला यापूर्वीच धोका असल्याचे वारंवार बोलले जात होते. अखेर त्यांच्या चालक आणि चेल्यांनीच बाबाची हत्या केल्याचे उघड झाले.

नाशिक : येवला तालुक्यातील अफगाणी धर्मगुरू झरीफ बाबा उर्फ ख्वाजा सैय्यद झरीफ चिश्ती (वय २८, रा. मूळ अफगाणिस्तान, ह. मु. मिरगाव, आदित्य हॉटेलमागे, वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांच्या चार मुख्य मारेकर्‍यांना अटक करण्यात आठव्या दिवशी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अद्याप दोन संशयित फरार असून, त्यांच्या मागावर पथके आहेत. परंतु, ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींकडून संपत्तीसाठीच खून केला गेल्याची कबुली देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, झरीफ चिश्ती यांनी पत्नी काही दिवसांपूर्वीच वावीत आली होती, तेव्हापासून बाबांच्या हत्येचा कट रचला गेला आणि कोपरगावच्या एका सराईताला या हत्येची सुपारी दिली गेली. त्यानुसार बाबाची डोक्यात गोळी झाडून हत्या केली गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत ५ जुलै रोजी चिंचोडी खु. एमआयडीसी शिवारात अफगाणी धर्मगुरू सुफी ख्वाजा सैय्यद झरीफ चिश्ती यांना काही मारेकर्‍यांनी ठार मारून त्यांची एक्सयूव्ही कार (क्र. एमएच ४३ बीयू ७८८६) घेऊन फरार झाले होते. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकास पाचारण करून तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार काही पथके जिल्हाबाहेर विविध ठिकाणी मारेकर्‍यांच्या शोधार्थ पाठवण्यात आली होती. बाबाची कार दुसर्‍याच दिवशी संगमनेर शहरात कारखाना रोड परिसरात मिळून आली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पाटील यांनी तपास पथकास अहमदनगर, पुणे व मंबई जिल्ह्यात रवाना केले. तेव्हा संगमनेर शहरात मिळालेल्या माहितीवरून ठाणे, मुंबई परिसरात आरोपी वास्तव्यास असल्याचे समजले. त्यनुसार पोलिसांच्या पथकाने खबर्‍यांमार्फत माहिती घेवून गफार अहमद खान याच्यासह गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड उर्फ पाटील (वय २८, रा. शिंदेमळा, लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर), रवींद्र चांगदेव तोरे (चालक- वय २५, रा. शहाजापूर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), पवन पोपट आहेर (वय २६, रा. विठ्ठलनगर, येवला) यांना रात्रभर पाळत ठेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.

या सर्व आरोपींची चौकशी केली असता त्यांनी येवला शहरातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात एका प्लॉटचे भूमिपूजन करण्याच्या बहाण्याने सुफी ख्वाजा सैय्यद झरीफ चिश्ती बाबांना बोलावून पूजाविधी केला. त्यानंतर झरीफ बाबा कारमध्ये बसले असता एकाने चालकाच्या बाजूकडील खिडकीतून बाबाच्या डोक्यावर बंदुकीतून गोळी झाडली. यानंतर या आरोपींनी बाबाची एक्सयूव्ही कार घेऊन पळ काढल्याची कबुली दिली. रवींद्र तोरे हा जरीफबाबाच्या वाहनावर पूर्वी चालक म्हणून कामाला होता. तसेच बाबाच्या खास सेवेकरी असलेल्या गफार अहमद खान याच्यो नावावरच बाबाने ही एक्सयूव्ही कार, जमीन आणि मोठी रक्कम ठेवली होती. मात्र, आरोपींनी बाबाची ही संपत्ती कायमची हडपण्याच्या उद्देशाने येवल्यातील प्लॉटवर भूमिपूजनाचा बहाणा केला आणि बाबाची हत्या केली. अखेर या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले असून, येवला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मथुरे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बाबावर गोळी झाडणारा संशयित आणि आणखी एक सहावा संशयित असे दोन संशयित अद्याप फरार असून, त्यांचा लवकरच शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे गुरुवारी (दि. १४) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, येवला शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक खंडागळे, सहायक उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार रवींद्र वानखेडे, जालिंदर खराटे, पोलीस नाईक सुशांत मरकड, सचिन पिंगळ, विनोद टिळे तसेच पोलीस हवालदार उदय पाठक, प्रशांत पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, नवनाथ वाघमोडे, येवला शहर पोलीस ठाण्याचे नाईक शहानवाज शेख, गणेश पवार यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याची कामगिरी केली.

‘बाबाचे अपत्य’ झाले असते संपत्तीचे मालक, म्हणून..

झरीफ बाबाची पत्नी गर्भवती होती. मात्र, ती दिल्लीत असल्याने कुणाला याची माहिती नव्हती. काही महिन्यांपूर्वी ती बाबाकडे आली असता चालक आणि चेल्याला कुणकूण लागली. तेव्हापासून बाबाला धोका निर्माण झाला होता. बाबांच्या पत्नीलाही याचा संशय होता. म्हणून ती वारंवार सावध करत होती. बाबाची बहिणही त्यांना सावध करत होती. बाबाने याकडे दुर्लक्ष केले. मूळात बाबा अफगाण रहिवासी असल्याने त्यांना भारतात कुठलीही संपत्ती घेता येत नसल्याने ते चालक आणि काही जवळच्यांच्या नावे संपत्ती घेत होते, रक्कम ठेवत होते. मात्र, बाबा आणि त्याच्या पत्नीला अपत्य होणार होते, जे भारतीय नागरिक ठरले असते. परिणामी, बाबाला सर्व संपत्ती त्याच्या नावे करता आली असती. याविषयी बाबाचा खून होण्याच्या ७ दिवसआधी वावीत येऊन गेलेल्या पत्नीत चर्चा होऊन वादही झाले होते. अखेर बाबांचा चेला गफार आणि चालक तोरे याने मिळून कोपरगावच्या एका सराईताला सुपारी देत बाबाला संपवण्याचा कट रचला. ज्यात बाबाच्या हत्येनंतर सर्व संपत्ती हडपण्याचे ठरले. मात्र, नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत या मारेकर्‍यांना आठ दिवसांत गजाआड करत त्यांचे मनसुबे उधळून लावले. या तपासात बाबाच्या बहीण आणि पत्नीचा जबाबही महत्त्वाचा ठरला.

बाबाचा मृतदेह अ‍ॅम्बेसीमार्फत अफगाणला पाठवणार

झरीफ बाबाचा मृतदेह अफगाण अ‍ॅम्बेसीसोबत झालेल्या चर्चेनुसार मुंबई आणि तेथून अफगाणला पाठवण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. त्यानंतर अफगाणमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

- Advertisment -