Whatsapp चॅट व्हायरल, आफताबकडून मारहाणीबरोबर मानसिक छळही

मुंबई : देशभरात खळबळ उडवणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रद्धाचे व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल झाले असून त्यात आफताब पूनावालाच्या क्रूरता दिसते. तो तिला आधीपासूनच मारहाण तर करत होताच, पण त्याचबरोबर तिचा मानसिक छळही करत होता.

श्रद्धाने आफताबच्या त्रासाला कंटाळून नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून. मात्र आत्महत्येची धमकी देत त्याने श्रद्धाला तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही आफबात श्रद्धाला मारहाण करत होता. त्याबद्दलचे पुरावे व्हॉट्स अॅप चॅटद्वारे समोर आले आहेत. श्रद्धा वालकर आणि तिच्या मित्रांमध्ये 24 नोव्हेंबर 2020 रोजी झालेले हे व्हॉट्स अॅप चॅट असून श्रद्धाने अफताबकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आपल्या मित्रांना माहिती दिली आहे. अफताबने इतके मारले आहे की, बेडवरून मी उठूही शकत नाही. मारहाणीमुळे खूप त्रास झाला असून रक्तदाब खूपच कमी झाला आहे, असे श्रद्धाने म्हटले आहे. यासोबतच श्रद्धाने चॅटमध्ये चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीचा फोटोही तिच्या मैत्रिणींना व्हॉट्सअॅप केला होता.

नालासोपाऱ्यातील ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 3 डिसेंबर 2020 रोजी श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाठ, मान आणि खांद्यावर तीव्र वेदना होत असल्याने श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेदना मारहाणीच्या होत्या असे म्हटले जाते. श्रद्धाला अॅडमिट केले जात असताना आफताब तिथे उपस्थित होता, मात्र मुलीच्या कुटुंबातून कोणीही आले नव्हते. हॉस्पिटलचे डॉ. एसपी शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.