Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम आफताबने आरोप फेटाळले; १ जूनपासून सुरू होणार खटला

आफताबने आरोप फेटाळले; १ जूनपासून सुरू होणार खटला

Subscribe

नवी दिल्लीः श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आफताब पुनावाला विरोधात मंगळवारी आरोप निश्चित करण्यात आले. आफताबने सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे त्याच्याविरोधात १ जूनपासून खटला सुरू होणार आहे.

दिल्लीतील साकेत कोर्टात आफताबविरोधात आरोप निश्चिती करण्यात आली. तुझ्यावर श्रद्धाच्या हत्येचा, हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. हे आरोप तुला मान्य आहेत का?, असे न्यायालयाने आफताबला विचारले. हे आरोप मला मान्य नाहीत, असे आफताबने न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने आफताबविरोधात रितसर खटला चालणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार १ जून २०२३ ही खटल्याची तारीख निश्चित करण्यात आली. आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत, असे श्रद्धाचे वडिल विकास वालकर यांनी सांगितले.

- Advertisement -

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीवर आरोप निश्चित केले जातात. आरोपीने आरोप मान्य केल्यास त्याला शिक्षा सुनावली जाते. त्यासाठी खास खटला चालवला जात नाही. सरकारी पक्ष पुरावे सादर करत नाही. बचाव पक्ष युक्तिवाद करत नाही. मात्र आरोपीने आरोप फेटाळल्यास त्याच्याविरोधात रितसर खटला चालतो. सरकारी पक्ष पुरावे सादर करतो. साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाते. हे पुरावे खोडून काढण्याचे काम विरोधी पक्ष करतो. साक्षीदारांची उलटतपासणी घेतली जाते. त्यानंतर शिक्षेसाठी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद होतो. शिक्षा देऊ नये अथवा कमीत कमी शिक्षा द्यावी यासाठी बचाव पक्ष न्यायालयात बाजू मांडतो. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालय निकाल देतो.

आफताबने आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात आता रितसर खटला चालणार आहे. १८ मे २०२२ रोजी श्रद्धाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा पोलिसांचा आफताबवर आरोप आहे. हा आरोप सिद्ध करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को आणि पॉलिग्राफ  टेस्ट केली. या टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. तसेच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केलेले अवयवही पोलिसांनी शोधून काढले. हे सर्व पुरावे पोलीस न्यायालयात सादर करतील.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -