घरमहाराष्ट्रआदिवासींची परवड कधी थांबणार? रस्त्याअभावी आदिवासी आजही घेतात डोलीचा आधार

आदिवासींची परवड कधी थांबणार? रस्त्याअभावी आदिवासी आजही घेतात डोलीचा आधार

Subscribe

जव्हार तालुक्यातील अनेक गाव-पाडे रस्त्यापासूून वंचित असून रुग्णांना डोलीत टाकून डोंगरातून वाट काढावी लागते

जव्हारहून अवघ्या २५ ते ३० किमी अंतरावर डोंगर दरी-खोर्‍यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही अद्याप या गावपाड्यात दळणवळणाची सोय नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याअभावी आजही रुग्णांना डोलीत घालून सात किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागत आहे.
तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांमध्ये रस्त्याअभावी अबालवृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले, चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजारी रुग्णाला लाकडाची डोली करून ६ ते ७ किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते. मात्र तेथेही जास्त सुविधा नसल्यामुळे २५ किमीचे अंतर प्रवास करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात यावे लागते.

दरम्यान प्रवासी वाहन वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागत आहे. यामुळे येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा हे झाप ग्रामपंचायतमध्ये, मनमोहाडी ऐना ग्रामपंचायतीत तर भाटीपाडा कुकडी हे पाडे पाथर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. या पाड्यांची एकूण लोकसंख्या १ हजार ४०० इतकी आहे. येथील शिक्षण घेत असलेल्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत. तसेच मनमोहाडी या पाड्यात ८० घरे असून त्यांना नदी ओलांडूनच रस्त्यावर यावे लागते. मात्र पावसाळ्यात नद्यांनी पातळी ओलांडल्यावर या गावाचा संपर्क तुटतो. परिणामी रुग्णाचे मोठे हाल होतात.

या भागात सर्पदंशामुळे शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकदिवस आड जव्हार येथील कुटीर रुग्णालयात सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. यातील काहींवर उपचार होऊन बरे होतात. तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. मागीलवर्षी ढवळू रामू गरेल आणि चांगुणा काकड गरेल यांचे सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाले होते. तसेच मृत्यूची नोंद न झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७३ वर्षे उलटली आहेत. परंतु अजूनपर्यंत दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे सोयीसुविधांपासून वंचित आहेत. दळणवळणाची सुविधा नाही. इथे कॅशलेस आणि डिजिटल इंडियाचा ढोल वाजवला जातो. परंतु या आदिवासी पाड्यात नेटवर्क नसल्याने, मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेणार? रुग्णाला डोली करून खांद्यावर घेऊन डोंगर चढावा लागतोय. लोकप्रतिनिधी इकडे फिरकत देखील नाही. – एकनाथ दरोडा, सामाजिक कार्यकर्ता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -