Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमपैसे वाटपाच्या आरोपातून ढिकले, गिते समर्थकांमध्ये पुन्हा राडा; वाहनांची तोडफोड

पैसे वाटपाच्या आरोपातून ढिकले, गिते समर्थकांमध्ये पुन्हा राडा; वाहनांची तोडफोड

Subscribe

स्कॉर्पिओ, इनोव्हाचे नुकसान, सहा जणांना अटक, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अवघ्या काही तासांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेपलेली असताना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात पुन्हा अ‍ॅड. राहुल ढिकले व गणेश गिते यांचे समर्थक आमनेसामने आले. महाविकास आघाडीच्या उमेदवार गितेंच्या समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. ढिकले याच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना पकडून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री ८.३० वाजता पंचवटीतील काट्या मारूती चौकातील चार हत्ती पुलालगत घडली. (After being cleared of money distribution charges, Geete supporters clash again; Vehicles vandalized)

पोलिसांनी पैसे वाटणारे संशयित निखिल रविकांत मिश्रा, प्रथमेश किरण श्रीवास्तव, लक्ष्मण काशीनाथ साबळे, निलेश सोमनाथ गोतरने यांना अटक केली असून, त्यांच्याकडून २० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. वाहन तोडफोडप्रकरणी दुसर्‍या गटाचे अविनाश पितांबर चौरे व अंकुश पांडुरंग भुजड या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील चार हत्ती पुलालगत असलेल्या वेताळ बाबा मंदिराजवळील गणेश गिते यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक भगवान भोगे हे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा संशय अ‍ॅड. ढिकले यांच्या समर्थकांना आला. त्यातून अ‍ॅड. ढिकले व गिते समर्थक सोमवारी (दि.१८) रात्री समोरासमोर भिडले. यावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यात स्कॉर्पिओ (एमएच १५ जेएच ५६००) व इनोव्हा (एमएच २० एएस २८२५)च्या काचा फुटून नुकसान झाले.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्यासह क्युआरटी टीमने घटनास्थळी धाव घेतली.
१४ नोव्हेंबर रोजी हिरावाडी परिसरात देखील अ‍ॅड. ढिकले आणि गिते समर्थकांमध्ये राडा झाला होता. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर वेताळ बाबा मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -