नाशिक : मान्सूनच्या पावसाने वातावरण अल्हाददायक झाले असले तरी अद्याप नाशिक जिल्हयात म्हणावा तसा पाउस न झाल्याने लोकांच्या ताटाचे बजेटही बिघडले आहे. जेवणाच्या ताटातून टोमॅटो दिवसेंदिवस गायब होत असतांना आता मिरचीच्या दराने ठसका दिला आहे. टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केल्यानंतर आता हिरव्या मिरचीचे दरही किरकोळ बाजारात १५० रूपयांवर जाउन पोहचले आहे.
जिल्हयाला अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे. समाधानकारक पाउस नसल्याने भाज्यांची आवकही घटली आहे. याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. बाजार समितीत एक किलो हिरव्या मिरचीसाठी १२० रुपये मोजावे लागत आहेत. तर किरकोळ बाजारात एका किलोसाठी १५० रुपये मोजावे लागत आहे. बाजारात जिल्ह्यासह नंदुरबार, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक होते. महिन्याभरापासून पावसामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. गेल्या पंधरवड्यात 50 ते 60 रुपये किलो असलेल्या हिरव्या मिरचीचे दर आता बाजार समितीत 120 रुपये किलोवर पोहोचले आहे. आल्याचा दरही 300 रुपये किलोवर पोहोचला आहे. भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. टोमॅटो आधीच स्वयंपाकघरापासून दूर झाला होते आता मिरची आणि आल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
भाज्यांचे दर
- हिरवी मिरची : १०० ते १२०
- कारले : ८० ते १०० रुपये
- दोडके : ८० ते १००
- गिलके : ८० ते १००
- भेंडी : ६० ते १००
- टोमॅटो : ८० ते १५०
- वाटाणे : १८० ते २४०
- बटाटा : २५ ते ३०
- मेथी : ५० ते ६० रुपये प्रति नग
- कोथिंबीर : १०० रुपये प्रति नग