कोरोना संपल्यानंतरच वाजणार संमेलनाचे सूप

दैनिक ‘आपलं महानगर’च्या भूमिकेवर शिक्कामोर्तब; साहित्य संमेलन स्थगित तरी समित्या राहणार सक्रिय

नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात यावे, अशी भूमिका दैनिक ‘आपलं महानगर’ने सुरुवातीपासूनच घेतली आहे. साहित्य महामंडळ आणि स्वागत मंडळाने रविवारी (दि.७) संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने ‘आपलं महानगर‘च्या भूमिकेवर शिक्केमोर्तब झाले आहे. सुरक्षित वातावरणातच संमेलन आयोजित करण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. कोरोना आवाक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच साहित्य महामंडळाने संमेलन स्थगित केले. त्यामुळे आयोजकांना अधिक तयारीसाठी वेळ मिळाला असून संमेलन दर्जेदार केले जाईल. कोरोनाची लाट गेल्यावर संमेलन आयोजित केले जाईल, अशी माहिती संमेलनाचे कार्यवाह हेमंत टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टकले म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या खर्च बचतीसाठी प्रयत्न करणार आहोत. योग्य तो खर्च योग्य त्या ठिकाणीच केला जाणार आहे. प्रायोजक मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. संमेलनासाठी काहीजणांनी सर्व भाज्या, तांदूळ दिले तर ते खर्च बचतीसाठी स्वीकारले जातील. पावसाबद्दल हवामान खात्याकडून अंदाज दिला जातो. त्यानुसार शेतकरी पुढील वाटचाल करत असतो. त्याप्रमाणे दर १५ दिवसांनी प्रशासन आणि आरोग्य विभागकडून कोरोनाचा आढावा घेतला जाईल. संमेलन स्थगित झाल्याने कोणीही नाराजी नाही. नाशिकचे साहित्य संमेलन सस्मरणीय होईल. नवी दिशा दाखवणारे, विज्ञानाष्ठित दृष्टिकोनातून २१ व्या शतकातील तिसर्‍या दशकाची वाटचाल कशी असावी, त्यात साहित्याचे योगदान काय असावे, या दृष्टीने साहित्य संमेलन मार्गदर्शक ठरेल, अशी आयोजकांना खात्री आहे. त्यानुसार आयोजक तयारीत आहेत. संमेलनासाठी फक्त नव्या तारख्या असणार असून, बाकी सर्व पूर्वनियोजित असणार आहे. यावेळी जयप्रकाश जातेगाव, विश्वास ठाकूर, दिलीप साळवेकर, चंद्रकांत दीक्षित, वसंत खैरनार, प्रा. शंकर बोर्‍हाडे, संजय करंजकर आदी उपस्थित होते.

आमदारांच्या निधीत कपात

साहित्य संमेलनासाठी आमदारांकडून मिळणार्‍या निधीबाबत पालकमंत्री छगन भुजबळ व लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वत: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. आमदारांना विकास निधी मतदार संघाबाहेर देताना अपवादात्मक तरतूद करावी लागते. सध्या राज्यावर आर्थिक संकंट आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी संमेलनासाठी १० लाख निधी देण्याचे कबूल केले असले तरी तशी व्यवस्था करणे अवघड वाटत असून, ती तरतूद ५ लाख रुपयांची केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. संमेलनासाठी राज्य शासनाकडून ५० लाख रुपये निधी मिळणार आहे. जिल्हा नियोजना समितीकडून २५ लाख रुपये निधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडून निधी मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे हेमंत टकले यांनी सांगितले.

शुक्रवारी उघडणार निविदा

संमेलनास तात्पुरती स्थगित असली तरी कुठलेही कामकाज थांबणार नाही. समित्यांचे कामकाज चालूच राहणार आहे. केटरिंग, प्रकाश योजना, मंडप, व्यासपीठ, दालने उभारणे आदी कामांसाठी ११ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात येत आहेत.१२ मार्च रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत, असे जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.