ईडीनंतर संजय पांडे आता सीबीआयच्या रडारवर

बीआयकडून लूक आऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या संजय पांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

sanjay pandey
sanjay pandey

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आता ईडीनंतर सीबीआयच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून आज त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, सीबीआयकडूनही लूक आऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या संजय पांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (After ED, Sanjay Pandey is now on the radar of CBI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काहीच दिवसांपूर्वी निवृत्त झाले. निवृत्त होताच तीन दिवसांनी त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज, ५ जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्यांना सीबीआयनेही लूक आऊट नोटीस जारी केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

संजय पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून कंप्यूटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर ते १९८६ बॅचचे आयपीएस ऑफिसर असून ३० जून २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. संजय पांडे पोलीस सेवेत दाखल होण्याआधी त्यांची एक आयटी कंपनी होती. या आयटी कंपनीकडून विविध कंपन्यांचं ऑडिट केलं जायचं. एनएसईच्या (National Stock Exchange of India Ltd.) माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांच्यासंबंधी घोटाळ्यातील आरोपप्रकरणी संजय पांडे यांची ईडी चौकशी होत आहे. चित्रा रामकृष्णन यांनी आनंद सुब्रमण्यम यांच्यासोबत शेअर बाजाराच्या यादीत प्रविष्ट असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. चित्रा रामकृष्णन यांनी एनएसई सर्व्हरमध्ये फेरफार करून त्याआधारे हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. हा गैरव्यवहार सुरू असताना एक आयटी क्षेत्रातील कंपनी एनएसईचे माहिती तंत्रज्ञानाच्याआधारे लेखापरीक्षण करीत होती. ही कंपनी संजय पांडे यांची असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्यामुळे त्यांचाही या घोटाळ्यात समावेश असल्याच्या संशयातून त्यांना  चौकशीसाठी ईडीने समन्स बजाविण्यात आले. तसेच, आता त्यांना सीबीआयनेही लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

भाजप नेत्यांना दिलेला त्रास भोवला?

संजय पांडे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजप नेत्यांना त्रास दिल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. तसेच, भाजप नेत्यांना ते सर्वाधिक टार्गेट करत असत. त्यामुळे सेवानिवृत्त होताच तिसऱ्याच दिवशी संजय पांडे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता सीबीआयने लूक आऊट नोटीस पाठवल्याचेही वृत्त समोर आले आहे.