घरमहाराष्ट्रकोल्हापूर-सांगलीनंतर खान्देशही अतिवृष्टीच्या छायेत

कोल्हापूर-सांगलीनंतर खान्देशही अतिवृष्टीच्या छायेत

Subscribe

तापी, पांझरा, बुराई, अरूणावती, अनेर, कान या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मागील काही दिवसांपासून धुळे, नंदुरबारमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळून पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर येऊन तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातून वाट काढत असतानाच आता पावसाने आपला मोर्चा खान्देशाकडे वळवला आहे. परिणामी येथील तापी, पांझरा, बुराई, अरूणावती, अनेर, कान या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मागील काही दिवसांपासून धुळे, नंदुरबारमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे.

मागील ८ दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबार या भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील घरांची पडझड झाली असून आतापर्यंत येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. येथील अनेक महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार अमळनेर, रावेर, जळगाव आणि जामनेर या ठिकाणी फायर बोटी, लाईफ रीग, सर्च लाईट, दोरखंड, लाईफ जॅकेट आदी साहित्य वितरीत करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीसांनी सावरली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बाजू


या भागात अतिवृष्टी

खान्देशातील नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व चार तालुक्यांसह जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, अमळनेर, चोपडा या ४ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अमळनेर तालुक्यावरही जलसंकट निर्माण झाले असून कळमसरे गावाला पूराच्या पाण्याचा वेढा पडल्याचे चित्र आहे.

पिकांवर रोगराईचा धोका

अतिवृष्टीमुले उडीद-मूगाची पिकांवर रोग पडण्यास सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे कपाशीची रोपांनाही धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत कृषी विभागाने तात्काळ बैठकीचे आयोजन करत तक्रारीनुसार पंचनामे करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान पांझरा आणि तापी नदीला पूर आल्याने जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -