कोरोना संकट गेल्यानंतर लघु, मध्यम उद्योजकांना व्यापक संधी – देवेंद्र फडणवीस

चेंबर्सचे विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अमरावती आणि इतर ठिकाणाहून अनेक मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

कोविडनंतरच्या काळात जागतिक पातळीवर काही ट्रेड बॅरियर्स निर्माण होण्याची शक्यता पाहता लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) व्यापक संधी निर्माण होतील, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंटस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये संबोधित करताना ते बोलत होते. चेंबर्सचे विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अमरावती आणि इतर ठिकाणाहून अनेक मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अडचणी, त्यावर सध्या केले जात असलेले उपाय, येणार्‍या काळात करावे लागतील असे उपाय, लघु आणि मध्यम उद्योजकांना येणार्‍या समस्या आणि नवीन संधी, निर्यात धोरणात आवश्यक बदल, उद्योजकांना खेळते भांडवल अशा अनेक विषयांवर प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले आणि शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

फडणवीस म्हणाले की, आज रिक्षाचालक, चहाचे छोटे दुकान चालविणारे, मंडपवाले अशा अनेक घटकांना अनेक समस्या येत आहेत. या प्रत्येकाचा विचार आपल्याला करावा लागेल. असंघटित कामगारांचा विचार प्राधान्याने करावा लागेल. लॉजिस्टिक आणि पुरवठा चेन हा उद्योगांचा कणा आहे. त्यामुळे सरकार जेव्हा लॉकडाऊनमध्ये स्थानिक स्तरावर काही सवलती देते, तेव्हा त्यासाठी आवश्यक परवानगी या ऑनलाईन दिल्या पाहिजेत. ही प्रक्रिया नियोजनाअभावी राबविली गेली, तर फसण्याचीच शक्यता अधिक असते. याप्रसंगी अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे.

येणार्‍या काळात जागतिक पातळीवर ट्रेड बॅरियर्स निर्माण होणार आहेत. अशात एमएसएमईना बर्‍याच व्यापक संधी प्राप्त होणार आहेत. अर्थात त्यांना खेळते भांडवल ही एक अडचण असेल, तर त्या स्थितीत चौकटीच्या बाहेर जाऊन काही निर्णय घ्यावे लागतील. जेव्हा आजार दुर्धर असतो, तेव्हा त्या क्षणापुरते त्या औषधाचे दुष्परिणाम पाहिले जात नसतात. दुर्धर आजारातून बाहेर निघणे आवश्यक असते. असेच उपाय या काळात करावे लागणार आहेत. अनेक व्यापार्‍यांकडून एप्रिल महिन्यातील विजेचा स्थिर आकार माफ करण्यात यावा, अशा मागण्या येत आहेत. या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल. सेवा क्षेत्रात सुद्धा अनेक संधी प्राप्त होणार आहे. येणार्‍या काळात पर्यटनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यापक संधी निर्माण होतील. विदेशी पर्यटनाकडे लोकांचा ओढा कमी असेल. महाराष्ट्राने याही संधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.