पवारांच्या राजीनाम्यानंतर कुंपणावरच्या नेत्यांचाच जास्त विलाप, ठाकरे गटाची टिप्पणी

मुंबई : राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील अनेक नावे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली (NCP) आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ व हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर, त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले, अशी बोचरी टिप्पणी ठाकरे गटाने केली आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पवारांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याची ‘सांगता’ अशा काही धक्कादायक प्रकाराने होईल, याची पुसटशी कल्पनाही नसावी. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी, असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – अजित पवारांचे अंतिम ध्येय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे…, ठाकरे गटाचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो, असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला, असे या अग्रलेखात नमूद करण्या आले आहे.

भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा तयार होता
पवार यांच्या निकटवर्तीय म्हणवणाऱ्यांचे असे सांगणे आहे की, साहेब खरं तर 1 मे रोजीच म्हणजे महाराष्ट्र दिनीच निवृत्तीची घोषणा करणार होते, पण मुंबईत महाविकास आघाडीची (MVA) ‘वज्रमूठ’ सभा (Vajramuth rally) असल्याने त्यांनी 2 मे रोजी घोषणा केली. आम्ही या मताशी सहमत नाही. आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या प्रकाशन सोहळ्यासारख्या कार्यक्रमातच निवृत्तीची घोषणा सयुक्तिक आहे. आत्मचरित्र हे त्यांच्या जीवन संघर्षाचे, राजकारणाचे सार आहे. त्या पुस्तकाचे न लिहिलेले पान म्हणजे त्यांचा राजीनामा हे समजून घेतले पाहिजे. पवार यांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.