वाझे, परमबीर नंतर पोलिसांतील नवा लेटर बॉम्ब, IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली

After sachin vaze and parambir singh new letter bomb against IPS Krishna Prakash recovered Rs 200 crore
वाझे, परमबीर नंतर पोलिसातील नवा लेटर बॉम्ब, IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली

वाझे, परमबीर नंतर पोलीस दलातील आणखी एका लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रामध्ये कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपयांची वसुली गोळा करण्यात आली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. पिपंरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणातून २०० कोटी गोळा करण्यात आले असल्याचा आरोप सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्र लिहून केले आहेत. आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर थेट आरोप करण्यात आले असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केले आहेत. यामध्ये आता आणखी एक वसुलीबाबतचं पत्र समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त असताना कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपये गोळा केला असल्याचा दावा सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी केला आहे. डोंगरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. कनिष्ठ पदावर असल्यामुळे हे करण्यापलिकडे कोणता पर्याय नव्हता असेही त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. पत्र समोर आल्यापासून आयुक्त कृष्ण प्रकाश नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते उत्तर देत नाही आहेत.

नेमका आरोप काय?

सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्र लिहून कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपये वसुली केली असल्याचा दावा केलाय.

कनिष्ठ पदावर असल्यामुळे हे करण्यापलिकडे कोणता पर्याय नव्हता असे त्यांनी सांगितले आहे.

शहरातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीची प्रकरणं हाताळण्यास सांगितले जात होते.

आयुक्तांसाठी गोळा झालेली रक्कम किमान २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली.

प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची.

आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे.

पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे.

राष्ट्रवादीच्या संबंधित असलेल्या स्पर्श घोटाळ्या प्रकरणी एका पत्रकाराला लाखो रुपये देण्यास कृष्ण प्रकाश यांनी सांगितले होते.

सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले.

पिंपरीमध्ये बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले.

पत्रात काय म्हटलं आहे? 

मी वरील नमुद विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो, की पिंपरी चिंचवड चे माजी पोलीस ४ आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्‍यता असून, यापासून मला संरक्षण मिव्ठावे ही विनंत्ती. मी नऊ वर्षापूर्वी फौजदार म्हणून पोलीस दलात भरती झालो आहे. त्यानंतर तीन वर्षापूर्वी माझी नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे झाली. मी बराच कालावधी हा नियंत्रण कक्ष येथे काढला आहे. कृष्ण प्रकाश यांची आयुक्त म्हणूत्न नियुक्ती झाल्यावर मी शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात माझी नेमणूक करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली होती.

तेव्हा त्यांनी मला सामाजिक सुरक्षा है स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुख पद दिले. निरीक्षक विठुठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक काम करीत असताना आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मनाप्रमाणे काम होत नसल्याचे कारण देत कुबडे यांना हटवून तेथे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांना नेमण्यात आले. तर मला सामाजिक सुरक्षा पथक प्रमुख आणि वाचक शाखेचे कार्यभार सांभाळण्यास सांगण्यात आले. वास्तवात कुबडे चांगले काम करीत असतानाही त्यांना बदलण्यात आले होते.

सामाजिक सुरक्षा पथक बरोबरीने मला वाचक शाखेचे काम बघण्यास सांगण्यात आले होते. या कालावधीत शहरातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीची प्रकरणं हाताळण्यास सांगितले जात होते. यातून मिळणारा पैसा करोड़ो रुपयांमध्ये असल्याने मला है पैसे स्वीकारण्यास सांगितले जात होते. आत्ता पर्यंत आयुक्तांसाठी गोळा झालेली रक्कम किमान २०० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. वास्तवात आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समोर आले. पण मी पदाने कनिष्ठ असल्याने है सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता.

ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावं लागतं होत. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे.

सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत.

या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे.

.यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळं मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास दिललेला नाही. त्यामुळं आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही अस सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबदार ठाम आहे, असं या व्हायरल पत्रात लिहिलेलं आहे.


हेही वाचा : देशातील वातावरण पाहून इंग्रजांची राजवट बरी होती, संजय रांऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल