संजय राऊत यांच्याकडील जबाबदारी शिवसेनेच्या ‘या’ चार नेत्यांवर

आजारपणामुळे आता संजय राऊत यांच्या सर्व कामांची जबाबदारी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

sanjay raut
खासदार संजय राऊत

राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार आहे. निवडणुकीच्या निकालापासून शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर राऊत मांडत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच ते आक्रमक झाले होते. या सर्व घडामोडींसह सेना भवनात जाणे, पत्रकार परिषद घेणे, कार्यकर्त्यांसोबत बैठकी घेणे, शिवसेना पक्ष श्रेष्ठींसोबत बैठका, चर्चा करणे अशा अनेक कामांची जबाबदारी ते पार पाडत होते. मात्र, आजारपणामुळे आता त्यांच्या या सर्व कामांची जबाबदारी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.


हेही वाचा – संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल


उद्धव ठाकरे आणि पवार यांची भेट

दरम्यान, सध्या राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होऊन आज १७ दिवस होऊन गेली आहेत. राज्याच्या भल्यासाठी लवकरात लवकर सत्ता स्थापन होणे जरुरीचे आहे. रविवारी निवडणुकीत सर्वाधिक जागांवर निवडून आलेल्या भाजप पक्षाने सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून माघार घेतली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. मात्र, त्यासाठी फक्त २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. याच मुदतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जुळवाजुळव सुरु आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांनी घेतली अहमद पटेल यांची भेट

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर दिल्लीत शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. आज संध्याकाळ साडे पाच वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे त्यात आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.