मुख्यमंत्री शिंदेंचे मिशन-२०० आता नजर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदारांवर

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन-२०० हाती घेतले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील २०० आमदार मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन-२०० हाती घेतले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील २०० आमदार मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता एकनाथ शिंदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनादेखील फोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (After Shiv Sena now Eknath Shinde is going to break the MLAs of Congress and NCP)

शिवसेनेच्या ४० आणि इतर अशा ५० आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. सध्या भाजप आणि शिंदे गटाकडे एकूण १७० आमदार आहेत. शिवसेनेने या निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार्‍या राज्यातील एकूण आमदारांची संख्या १८५वर पोहचली आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना २०० आमदारांचे लक्ष्य गाठण्यासाठी अजून १५ आमदारांची कमतरता भासत आहे. त्यामुळे उरलेली १५ मते मिळवण्यासाठी त्यांना विरोधकांची मते फोडावी लागणार आहेत.

साहजिकच त्यांची नजर विरोधी बाकावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडे वळल्याचे म्हटले जात आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मते फुटली होती. एवढेच नाही तर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ आमदारांनी आपल्याच पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना मते न देता काँग्रेसचेच दुसरे उमेदवार भाई जगताप आणि भाजपच्या उमेदवारांना मतदान केले होते. विश्वासदर्शक ठरावावेळीही काँग्रेसचे १० आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मते फुटण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

गुप्त मतदानाचा फायदा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते. तांत्रिकदृष्ट्या कुठलाही व्हीप लागू होत नाही. त्यामुळे या गुप्त मतदानाचा फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला होण्याची शक्यता आहे. याच माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले २०० आमदारांचे टार्गेट पूर्ण करू शकतील, असे म्हटले जात आहे.