AC बंद, दारं-खिडक्या उघडा; ऐन उन्हाळ्यात बीड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला अजब निर्णय

बीड जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताच दिपा मुधोळ मुंडेंनी फोडला कर्मचाऱ्यांना घाम. कार्यालयातील एसी केले बंद. दालनाचे दरवाजे आणि खिडक्या कायम उघड्या ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

मुंबई |  कलेक्टर ऑफिसमधील कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये एकही एसी लावला जाणार नाही, असा अजब निर्णय बीड (Collector of Beed) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे (Deepa Mudhol-Munde) यांनी घेतला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात हा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सरकारी गाडी, एसी केबिन आणि सरकारी यंत्रणेतील सर्व सुख-सुविधा उपभोगण्याचा अधिकार क्लास वन अधिकाऱ्याला मिळतात, अशी आपली सर्वांची धारणा आहे. यासाठी अनेक जण सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगतात. परंतु, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे याला अपवाद ठरल्या आहेत.

जिल्हाधिकारी दिपा  यांनी बीड जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या केबिनपासून सुरुवात केली आहे. दीपा मुधोळे-मुंडेंनी केबिनमध्ये एसीची हवा नको, आणि त्यांच्या केबिनमधील दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असाव्यात. यानंतर त्यांना दिलेल्या व्हीआयपी गाडीतही एसी नसावा आणि त्यांच्या गाडीच्या काचा उघड्या असाव्यात. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असलेला एसी बंद करण्यास सांगितले आहे. फॅन आणि खिडकीतून येणारी नैसर्गिक हवा असावी, असे आदेश दीपा मुधोळे-मुंडेंनी ऐन उन्हाळ्यात दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

बीड जिल्ह्यातील पहिल्याच स्त्री जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे प्रत्येक कामावर आणि अधिकाऱ्यांवर लक्ष देत काम करून घेत असल्याचे दिसून येत आहेत. “माझ्या कार्यलयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले वाटले पाहिजे. बाहेर येणारी प्रत्येक व्यक्ती सरळ एसीत आल्यानंतर थंड हवा सहन करू शकत नाही. आणि सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्यांना एसीची हवा कशासाठी हवी? ज्या ठिकाणी सरकारी कार्यालये आहेत त्या ठिकाणी झाडांनी नटलेली बाग, मोकळी हवा असलेले कार्यालय असतात. या सर्वांचा आपण आस्वाद घेण्याची गरज असते. मग एसीच्या हवेची गरज कशाला?”, असा सवाल दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यलायत त्यांनी घेतल्या निर्णयाचे पालन होताना दिसत आहे.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनचे दरवाजे आणि खिडक्या नेहमीच बंद असायच्या, परंतु, आताचे चित्र बदले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी खूप वाट बघावी लागत नाही. कारणे, केबिनचे दरवाजे खुले असल्याने बाहेर कोण आले, याकडे सहज लक्ष जाते, असे दीपा मुधोळ-मुंडेंनी सांगितले. प्रत्येक गाडीच्या काचा खुल्या असतात आणि नॉन एसी कारमधून जिल्हाधिकारी फिरतात. यामुळे सर्व सामान्यांना जिल्हाधिकारी पाहायला मिळतात. सर्व सामान्यांच्या मनात जिल्हाधिकाऱ्याबद्दल विश्वास आणि आदर वाढला आहे, असे त्या म्हणाल्या.

दीपा मुधोळ-मुंडेंची थोड्यात माहिती

दीपा मुधोळ-मुंडे या २०११ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. दीपा मुधोळ-मुंडेंनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेला प्रारंभ केला. यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील दीपा मुधोळ-मुंडेंच्या कामाची सर्वत्र प्रशंसा देखील झाली होती. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी विभागात सेवा बजावल्यानंतर धाराशिवच्या जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. तसेच कोरोना काळात दीपा मुधोळ-मुंडेंनी सलग ३७ दिवस संपूर्ण जिल्हा ‘ग्रीन झोन’ ठेवला होता. तसेच संभाजीनगर येथील सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी कार्यरत होत्या. यानंतर बीड जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.