‘त्या’ प्रसंगानंतर आढळराव पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी अढळपणे उभे राहणार का?

मुंबई : आपण अजूनही उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेतच आहोत, असे सांगत लगचेच शिंदे गटात सामील होणाऱ्या काही नेत्यांमध्ये शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल, शुक्रवारी पुण्यात रोड शो केला, त्यानंतर पत्रकार परिषदही घेतली. एका प्रसंगानंतर तिथे उपस्थित असलेले आढळराव पाटील पत्रकार परिषद सोडून निघून गेले.

गेल्यावर्षी जूनमध्ये शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर मंत्री उदय सामंत, आमदार दिलीप लांडे, आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच शीतल म्हात्रेंसह अन्य काही नेत्यांनी आपण काहीही झाले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे छातीठोकपणे सांगितले होते. पण नंतर एकनाथ शिंदे यांच्या गोटात हे सर्वजण सामील झाले. यातील अनेक बंडखोरांना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विविध पदे देण्यात आली आहेत.

आता पुण्यामध्ये चिंचवड आणि कसबा पेठमध्ये पोटनिवडणूक होत आहे. काल, शुक्रवारी तिथे प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा उमेदवार अश्विनी जगताप (चिंचवड) आणि हेमंत रासने (कसबा पेठ) यांच्यासाठी शुक्रवारी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या एका बाजूला नरेश म्हस्के तर, दुसरीकडे आढळराव पाटील बसले होते. पत्रकार परिषद संपवून मुख्यमंत्री शिंदे उठत असताना पत्रकारांनी त्यांना थांबविले. त्यामुळे ते पुन्हा खुर्चीवर बसले आणि बसल्यावर त्यांनी आढळराव पाटील यांना हाताने बाजूला केले. त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच आढळराव पाटील पत्रकार परिषदेतून निघून गेले. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा आता रंगली आहे.

‘सामना’तील बातमीने दुखावले होते आढळराव पाटील
शिवसेनेचे उपनेते (ठाकरे गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर जाहीर शुभेच्छा दिल्या. या पार्श्वभूमीवर, आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामना वृत्तपत्राने दिली होती. पण नंतर, ही बातमी अनावधानाने छापण्यात आली होती. शिवाजीराव आढळराव पाटील हे उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत, असा खुलासा ठाकरे गटाने केला होता.

यामुळे आढळराव पाटील दुखावले गेले होते. मी खूप दु:खी झालो आहे. पक्षाने असे करायला नको होते. प्रामाणिक एकनिष्ठ राहून पक्षाने असे करणे मला आवडले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. आता पुन्हा ते नाराज झाल्याचे पाहायला मिळाल्याने विविध चर्चा आता रंगल्या आहेत.