घरताज्या घडामोडीचिमुकल्यावरील हल्ल्यानंतर चाडेगाव-मोहगावात बिबट्यांचा वावर

चिमुकल्यावरील हल्ल्यानंतर चाडेगाव-मोहगावात बिबट्यांचा वावर

Subscribe

नागरिकांच्या मोबाईलमध्ये बिबटे कैद; पंधरा दिवसानंतरही पिंजरे रिकामेच, मात्र हल्ले कायम

नाशिकरोड : सामनगाव येथे रविवारी (दि.२८) रात्री बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच चाडेगाव व मोहगाव या भागात बिबटे दिसल्याने दहशत वाढली असून वन विभागाचे अधिकारी आता मोहगावात दाखल झाले आहेत.

रविवारी रात्री सामनगाव शेजारीच चाडेगावच्या माणिक नागरे यांच्या बंगल्याशेजारी दोन बिबटे आढळून आल्याने नागरिकांनी आरडाओरडा करत फटाके वाजवत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्याचे मनसेचे गोकुळ नागरे यांनी सांगितले. दरम्यान, मोहगावच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उसाच्या शेतात व मोकळ्या रानात तीन बिबटे आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. बिबट्या आढळून आल्याचे समजताच वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोहगाव येथे दाखल झाले आहेत. बाभळेश्वरचे पोलीस पाटील साहेबराव बटाव यांनीही यास दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान बाभळेश्वर, मोहगाव, चाडेगाव, पळसे, शिंदे, चेहेडी आदी भागांत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे पंधरा पिंजरे लावलेले आहेत. मात्र, बिबट्या पिंज-यात न येता या भागात मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याने बिबट्याची दहशत वारंवार वाढत चालली आहे. मनसेचे पदाधिकारी गोकुळ नागरे व भाजपचे तालुका पदाधिकारी सुनील जाधव यांनी वन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘आपलं महानगर’कडे या बिबट्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

रविवारच्या घटनेने पुन्हा दहशत 

- Advertisement -

दरम्यान, रविवारी सायंकाळी सामनगाव परिसरात ओम कडभाने या चिमुरड्यावर बिबट्याने ह्ल्ला करुन गंभीर जखमी केले. यामुळे बिबट्याचा या भागातील सहावा हल्ला असल्याचे समजते. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, ओमला जिल्हा रुग्णलयातून उपचारासाठी  एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे समजते. यापूर्वी हिंगवणेढा गावातील अकरा वर्षीय मुलगा, दोनवाडे तीन वर्षीय बालक, दोनवाडे येथे ७६ वर्षीय वृद्ध त्यानंतर बाभळेश्वर येथे चार वर्षीय चिमुरडीचा बळी घेतल्याच्या घटनांनी परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. सुदैवाने शेवगेदारणा येथील पाच वर्षीय चिमुकली तिच्या आजीच्या सतर्कतेने बचावली होती.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -