घरमहाराष्ट्रगुजरातच्या राज्यपालांनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही अभिभाषणातून काढता पाय; नवा पायंडा पडल्याची चर्चा

गुजरातच्या राज्यपालांनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही अभिभाषणातून काढता पाय; नवा पायंडा पडल्याची चर्चा

Subscribe

राज्यपाल 'सेंट्रल हॉल'च्या सभागृहात पोहोचताच सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोश्यारी यांच्या विरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत घोषणा दिल्या, तर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्या. त्यामुळेच राष्ट्रगीताची वाट न पाहता राज्यपाल बाहेर पडल्याची चर्चा आहे.

मुंबईः गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसनं जोरदार हंगामा केल्यानं तिथल्या राज्यपालांनी 5 मिनिटांत अभिभाषण उरकलं. त्याचाच कित्ता आता महाराष्ट्राच्या अधिवेशनात गिरवल्याचंही पाहायला मिळालंय. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेसुद्धा आपले अभिभाषण काही मिनिटांत अर्ध्यावर सोडून बाहेर निघून गेल्यानं राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरतोय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिभाषण सुरू असतानाच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण थांबवले आणि ते सभागृहाच्या बाहेर निघून गेले. भाजपकडून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली, तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर टार्गेट केले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण अर्ध्यावर सोडत काढता पाय घेतला. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो असं कधी झालंय, त्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा ठरत आहे.

- Advertisement -

राज्यपाल ‘सेंट्रल हॉल’च्या सभागृहात पोहोचताच सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी कोश्यारी यांच्या विरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत घोषणा दिल्या, तर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या घोषणा दिल्या. त्यामुळेच राज्यपाल बाहेर पडल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांचे अभिभाषण पूर्ण न केल्याबद्दल महाविकास आघाडीला दोष दिला. तसेच राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही राज्यपालांवर टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे. भाजपच्या आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. आम्हीही विरोधी पक्षात होतो, पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही, अशी भावना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. सभागृहात राज्यपाल भाषणाला आल्यावर आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ नावाने घोषणा दिल्या, त्या घोषणा सहन न झाल्याने राज्यपालांनी आपले भाषण अर्धवट सोडून विधानभवनातून पळ काढल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय.

- Advertisement -

विशेष म्हणजे गुजरातमध्येही अशीच घटना घडलीय. गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिल्याच दिवस काँग्रेस पक्षाच्या विरोधामुळे मोठा गदारोळाने निर्माण झाला. यादरम्यान काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विविध मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाविरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि या गोंधळात अस्वस्थ झालेल्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेतील त्यांचे पारंपरिक अभिभाषण तातडीने संपवले आणि ते निघून गेले. विरोधी पक्षांचे सुमारे 50 आमदार सभागृहात सतत घोषणा देत होते आणि यावेळी त्यांच्या हातात विविध मुद्दे लिहिलेले फलक होते. घोषणाबाजीत राज्यपालांनी अवघ्या पाच मिनिटांत भाषण उरकले आणि ते सभागृहाच्या बाहेर निघून गेले.

गुजरातच्या राज्यपालांनी महात्मा गांधींचे स्मरण करून आपल्या पारंपरिक अभिभाषणाची सुरुवात केली. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरजी थुम्मर यांनी मध्यस्थी केली आणि राज्यपालांना विनंती केली की, त्यांनी आधी भाजप सरकारला गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करणे थांबवावे. तरीही विरोधी पक्षांकडून होत असलेल्या सततच्या घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरूच ठेवले, मात्र त्यानंतर काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ आमदार उभे राहिले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. मग राज्यपालांनी लागलीच सभागृहाच्या बाहेर जाण्याचे ठरवले. महाराष्ट्रात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि विरोधात भाजप आहे. तर गुजरातमध्ये भाजप सत्ताधारी आहे, तर काँग्रेस हे विरोधी पक्षात आहे. परंतु दोन्ही राज्यातील राज्यपालांकडून झालेल्या कृतीनं राज्याच्या राजकारणात नवा पायंडा पडला तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


हेही वाचाः Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना मोठा धक्का, ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -