घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023संसदेनंतर विधानसभेतही राहुल गांधींविरोधात सत्ताधारी आक्रमक, माफी मागण्यासाठी ठराव आणणार?

संसदेनंतर विधानसभेतही राहुल गांधींविरोधात सत्ताधारी आक्रमक, माफी मागण्यासाठी ठराव आणणार?

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | संसदेत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही याचे पडसाद उमटले आहेत.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीविरोधात भाष्य केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. संसदेत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही याचे पडसाद उमटले आहेत. राहुल गांधींनी भारतीयांची माफी मागावी अशी आग्रही मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात बराच गोंधळ घातला. अखेर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृह दोनवेळा स्थगित करावं लागलं.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरले. काश्मीरमध्येही त्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला. यामुळे आम्ही राहुल गांधींची निंदा करतो, असं प्रताप सरनाईक यांनी सभागृहात मांडलं. प्रश्नोत्तरांचा तास संपताच प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना अनुमोदन केलं. तसंच, सभागृहात राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी चोर है म्हणत सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला.

- Advertisement -

विदेशात जाऊन भारताविषयी बोलणं सहन केलं जाणार नाही. बाबासाहेबांनाही काँग्रेसने निवडणुकीत पाडलं होतं. या काँग्रेसने सावरकरांविषयही अपशब्द वापरले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती, त्या मागणीला तुम्ही चिटकून आहात का, असा प्रश्न संजय शिरसाट यांनी शिवसेनेला यावेळी विचारला. काँग्रेसने कसाबला बिर्याणी चारली, त्याचा उदोउदो केला. पण सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. माहिममध्ये अतिक्रिमण केल्याचं समजताच मुख्यमंत्र्यांनी लागलीच ते अतिक्रमण हटवलं. या सभागृहात आम्ही राहुल गांधींविरोधात निषेधाचा ठराव मांडतो, असं संजय शिरसाट म्हणाले.

काँग्रेस सर्वांची माफी मागणार का? असा प्रश्न उपस्थित भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी परदेशात भारताचा अपमान केलाच तसंच भारत स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांच्या कर्तृत्वामुळे ज्यांच्या नावापुढे स्वातंत्र्यवीर लागलं त्यांचाही अपमान केला. मनिषशंकर अय्यर यांच्याविरोधात पायातील जोडे काढून बाळासाहेबांनी जोडे मारले होते, पण आता सावरकरांचा अपमान केला जातोय, भारताचा अपमान केला जातोय, राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे. बाळासाहेब थोरात तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माफी मागा, असा संतापही आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -