Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र टोमॅटोपाठोपाठ कांद्याचीही आयात; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

टोमॅटोपाठोपाठ कांद्याचीही आयात; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

Subscribe

नाशिक : गेली चार महिने चाळीतल्या कांद्यावर खर्च करून तो सांभाळला. आता मात्र कांद्याला चांगला भाव मिळायला लागला, तर केंद्र सरकारने ३ लाख मेट्रिक टन कांदा बाजारात उतरवायचा निर्णय घेतला. केंद्राचे हे धोरण म्हणजे शेतकर्‍याचे मरण असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍याच्या कांद्याला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र मे-जून महिन्यात उन्हाळ कांद्याला केवळ ७०० रुपयांच्या आसपास भाव मिळाला होता. त्यावेळी राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने राज्यात तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. आता तोच कांदा सर्वसामान्य ग्राहक केंद्रस्थानी ठेवत हाच पुन्हा बाजारात दाखल करत किरकोळ बाजारातील कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. कांद्याला सध्या २ हजार १०० रुपये सरासरी भाव आहे.

- Advertisement -

हा भाव ५ हजार रुपये जरी झाला तरी देखील शेतकर्‍यांचे नुकसान केवळ भरून निघणार आहे. शेतकर्‍याचा कुठलाही फायदा होणार नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. जेव्हा कांद्याचे भाव कोसळले होते तेव्हा कुठे गेले होते हे सरकार? असा सवाल करत सर्वसामान्यांचे हित बघण्यासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात न उतरवता थेट ग्राहकांच्या घरीच नेऊन द्या, असा संतप्त सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी म्हणतात, निर्णय मागे घ्या

कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत शेतकर्‍याला साधारण ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च येत असतो. त्यातच अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यास केलेला खर्च देखील वसूल होत नाही. अशातच कांद्याला जर चांगला भाव मिळाला तर त्यामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात का होईना सुखावणार आहे. परंतु, त्याचे हे सुख न बघवलेल्या केंद्र सरकारने केवळ ग्राहक हित बघितल्याने शेतकरीवर्ग नाराज आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा असेही काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल २३०० ते २६०० पर्यंत होते. नाफेडचा कांदा बाजारात दाखल करण्याचा निर्णय होताच बाजार समितीत कांद्याचे भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत. नाफेडने खरेदी केलेला कांदा जर बाजारात प्रत्यक्ष दाखल झाला ते कांदा दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -