घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदोन दिवसानंतर अखेर 'हर हर महादेव'चा 'शो ऑन'; प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद

दोन दिवसानंतर अखेर ‘हर हर महादेव’चा ‘शो ऑन’; प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद

Subscribe

वादाच्या पार्श्वभूमीवर २५ टक्केच प्रेक्षकांची उपस्थिती, मनसेच्या मागणीला यश, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : ‘हर हर महादेव’ चित्रपटामुळे मागील दोन दिवसापासून नाशिकच राजकारण ढवळून निघत असताना अखेर बुधवारी (दी.९) सायंकाळी ७ वाजता शहरातील दोन चित्रपटगृहात शो सुरू करण्यात आले. राज्यात चित्रपटावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर नाशिक मधील चित्रपटगृह चालकांनी वाद मिटत नाही तोपर्यंत चित्रपटाचा शो न चालवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत शहरातील पीव्हीआर चित्रपटगृहात भेट देत निवेदन सादर केले. राज ठाकरे यांचा आवाज लाभलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपटाचा शो सुरू करावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. मनसेच्या मागणीला आज यश आल्याचे दिसून आले. सिटी सेंटर मॉलमधील पीव्हीआर आणि नाशिकरोड येथील रेजिमेंटल प्लाझा या दोन चित्रपटगृहात सायंकाळी अनुक्रमे ६.५५ आणि ७ वाजता शो दाखवण्यात आला. शो सुरू होण्याआधी संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर दोन्ही ठिकाणी नियोजित वेळेत शो सुरू झाले. परंतु, वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. सिटी सेंटर मॉल मधील पीव्हीआर चित्रपटगृहात २०२ आसनं संख्या असताना मात्र ५६ प्रेक्षकांनी सिनेमा बघण्याला पसंती दर्शवली.

राष्ट्रवादी, स्वराज्य संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेकडे लक्ष

 चित्रपट सुरू न करण्याची मागणी करणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच चित्रपटाचा शो लावल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देणार्‍या स्वराज्य संघटनेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या शोच्या निमित्ताने पुन्हा शहरात संघर्षाची स्थिती निर्माण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत मनसेकडून किंवा राष्ट्रवादी, स्वराज्य संघटना यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उमटलेली नाहीये. मात्र, मंगळवारी दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व स्वराज्य संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत आता संभाजी ब्रिगेडनेही गनिमीकावा करत शो बंद पडण्याची भूमिका घेतल्याने त्यांचीहि पुढची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून चित्रपटगृहाच्या सुरक्षेत मागील दोन दिवसापासून वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वादात सहभागी असलेले राजकीय पक्ष आणि संघटनांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणा बारीक ठेऊन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -