उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं सूचक ट्विट, म्हणाले… नशीब आणि कर्तृत्व

गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र सध्याच्या राजकीय गोंधळात त्यांची प्रतिक्रिया आलेली नव्हती

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी उशिरा फेसबुक लाईव्ह करत ही घोषणा केली. फेसबुक लाईव्हदरम्यान सर्वांचे आभार व्यक्त करत उद्धव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडण्याची घोषणा केली. फेसबुक लाईव्हवर राजीनामा जाहीर केल्यानंतर लगेचच ते राजभवनाकडे रवाना झाले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

या सर्व राजकीय नाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मौन साधून होते. अखेर राज ठाकरेंनी ट्विट करत नाव न घेता उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला लगावला आहे. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी हे ट्विट मराठीतून केलं असून, खाली स्वतःची स्वाक्षरीसुद्धा आहे. राज ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलं आहे.

गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र सध्याच्या राजकीय गोंधळात त्यांची प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता शिवसेनेचे सरकार पडल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी आघाडीवर निशाणा साधला आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. माझे एकच सांगणे आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असं तेव्हा राज ठाकरे म्हणाले होते. मशिदींवरील भोंगे 4 मेपर्यंत काढा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावत त्यांना ताब्यात घेतले होते. या सर्व प्रकारानंतर राज ठाकरे यांनी आक्रमक होत उद्धव ठाकरे यांना थेट इशारा देत तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नसल्याचा टोला लगावला होता.


हेही वाचाः मुंबईत गेल्यावर पुढची रणनीती सांगेन, एकनाथ शिंदेंची गुगली