Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र शिवसेना, राष्ट्रवादीने गृहीत धरू नये, यासाठीच पटोले आक्रमक

शिवसेना, राष्ट्रवादीने गृहीत धरू नये, यासाठीच पटोले आक्रमक

महविकास आघाडी सरकार पाडण्याचा हेतू दिसत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Related Story

- Advertisement -

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर असून हे सरकार सत्तेत आल्यापासून इतर दोघांनी काँग्रेसला कायम गृहीत धरलेले आहे. यामुळे कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नव्हते. काँग्रेसचे आधीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना तर गुंडाळून टाकले जात असल्याने हा प्रकार जोरात सुरु होता. मात्र आक्रमक नाना पटोले यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर यापुढे आम्हाला गृहीत धरू नये, असा इशाराच द्यायला सुरुवात केल्यामुळे काँग्रेस पक्ष आता चर्चेत आला आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा काँग्रेसचा कोणताही हेतू नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्याचे जाहीरपणे सांगत खासदारकीचा राजीनामा देणारे पटोले यांचा राजकीय प्रवास हा कायम आक्रमक राहिला आहे. भाजपचे कमळ सोडून काँग्रेसचा हात हातात घेणारे पटोले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष होते. मात्र थोरात यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रभाव कमी पडत असल्याने सरकारमध्ये काँग्रेसला सुरुवातीपासून गृहीत धरले गेले. याचा परिणाम काँग्रेस आमदारांच्या सरकारकडील मागण्यांवर सुद्धा होत होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, पालकमंत्रीसुद्धा त्यांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने शेवटी पक्षश्रेष्ठींनी पटोलेंकडे धुरा देताना काँग्रेसला मुख्य धारेत ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आणि पक्षाच्या आदेशानुसारच पटोले सध्या काम करत आहेत, असे दिसते.

- Advertisement -

भाजपच्या मोठ्या लाटेत काँग्रेसचा स्वतःचा जनाधार आजही टिकून आहे. बहुजन, दलित आणि मुस्लिम अशी व्होटबँक काँग्रेसपासून दूर गेलेली नाही. हा जनाधार कायम ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणण्यासाठी नेतृत्वाने आक्रमक होणे खूप गरजेचे होते. तेच काम पटोले करत आहेत. मुळात त्यांचा स्वभावसुद्धा तसाच असल्याने ते चर्चेत असल्याचे दिसते.

काँग्रेसच फुटणार नाही

महविकास आघाडी सरकारवर अधांतराचे ढग असून हे सरकार कधीही कोसळू शकते, असे वातावरण सध्या भाजपकडून निर्माण केले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एक पक्ष भाजपला जाऊन मिळेल, असे बोलले जाते. मात्र काँग्रेसची तशी कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. यामुळेच भाजपविरोधात आज राज्यभर जी काही मोठी राजकीय आंदोलने सुरु आहेत, ती काँग्रेसची आहेत आणि त्याचे नेतृत्व पटोले करत आहेत.

- Advertisement -