दावोसमधील करारांची अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई : दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी 1 लाख 55 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून या कराराची संपूर्ण अंलबजबजावणी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. या गुंतवणुकीनंतर राज्यात 1 लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यातील सरपंचानी आज, शुक्रवारी शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील गुंतवणुकीवरून टीका करणाऱ्या विरोधी पक्षाचा समाचार घेतला. दावोसमध्ये जे उद्योजक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी भेटले, ते महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आग्रही आणि गंभीर होते. त्यांना उद्योग उभारण्यासाठी जमीन आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आपण उद्योग विभागाला तेथेच केल्या. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. राज्यात उद्योगाला पूरक असे वातावरण आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. या उद्योगांना आम्ही अनुदान देणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.

केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार काम करत आहे. त्यामुळे दावोसमध्ये सामंजस्य करार केलेले उद्योग महाराष्ट्रात येतील. ज्यांनी तेथे करार केले नाहीत, ते उद्योजक येथे येऊन करार करतील. मी केवळ गुंतवणुकीचे आकडे फुगवून दाखविण्यासाठी दावोसला गेलो नव्हतो, तर राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे राज्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योग येणार असून त्याद्वारे राज्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी
विद्यमान आमदाराच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपल्याकडे प्रथा आहे. मुंबईत पोटनिवडणूक होती, तेव्हा भाजपाने आणि आम्ही उमेदवार मागे घेऊन सहकार्य केले होते. त्यामुळे विरोधी पक्षाने पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत विचार केला पाहिजे, असेही शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. येत्या 27 फेब्रुवारीला पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले.

फडणवीस यांच्यासोबत ऑनलाइन बैठक
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज, शुक्रवारी ऑनलाइन बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे ऑनलाइन बैठकीत दोघांमध्ये या विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.