Farm Laws Repealed: उशिरा का होईना मोदी सरकारला जाग आली – दादाजी भुसे

agriculture minister dadaji bhuse reaction on farm laws repealed
Farm Laws Repealed: उशिरा का होईना मोदी सरकारला जाग आली - दादाजी भुसे

मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या ३५९ दिवस शेतकऱ्यांचा दिल्ली सिंघू बॉर्डरवर लढा सुरू आहे. आजही शेतकरी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसलेले आहेत. मात्र आज बळीराजाच्या या लढ्यासमोर मोदी सरकारला झुकावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना संबोधित करताना तिनही कृषी कायदे मागे घेतल्याची मोठी घोषणा केली. यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, ‘उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आली.’

दादाजी भुसे ट्वीट करून म्हणाले की, ‘केंद्र सरकारने तिनही कृषि कायदे रद्द करण्याची घोषणा केली. खरंतर गेल्या वर्षभरापासून ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत हक्कासाठी, न्यायासाठी आंदोलन करीत असलेल्या देशभरातील शेतकरी बांधवांच्या दृढ निश्चायचा, लढ्याचा हा विजय आहे.’

पुढे भुसे म्हणाले की, ‘कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आधीच झाला असता तर निष्पाप शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते. मा.पंतप्रधान महोदयांनी शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन चर्चा करून निर्णय घेतला असता तर वेळीच शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता, असो उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आली.’

मोदी काय म्हणाले?

दरम्यान गुरुनानक जयंती निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. ‘मी तिनही कृषी कायदे मागे घेतो. ही मोठी घोषणा करत असताना मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येत काही कमी राहिली असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिनही कृषी कायदे मागे घेतो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा – Farm Laws : पंजाब-यूपीच्या निवडणुकीत फटका बसेल म्हणून कृषी कायदे रद्द केले; शरद पवारांचा मोदींवर घणाघात