घरमहाराष्ट्रAbdul Sattar : शालेय अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश; सत्तार यांची माहिती

Abdul Sattar : शालेय अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश; सत्तार यांची माहिती

Subscribe

मुंबई : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल मंगळवारी शिक्षण विभागाने स्वीकारला. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी यावेळी दिली. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती, शेतीव्यवसाय करणाऱ्यांबद्दल जाणीव आणि संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.

शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. यासंदर्भातली अहवाल कृषी विभागाने (Department of Agriculture) तयार केला असून तो अब्दुल सत्तार यांनी आज, मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांना सुपूर्द केला. यावेळी सत्तार म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर, पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषीविषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते उपलब्ध करून देण्याची तयारी कृषी विभागाची आहे.

- Advertisement -

हेही वाचा – WhatsAppवरून खासदारांना आमंत्रण दिल्याने कृषीमंत्री सत्तारांचा संताप; म्हणाले…

तर, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा. अभ्यासक्रमाची रचना करताना विद्यार्थ्यांना संबंधित विषयाबद्दल रुची निर्माण होईल या पद्धतीची ती असावी, अशी अपेक्षा केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, कृषी विभागाचे सहसचिव बाळासाहेब रासकर, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -