बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षीय सागरची मृत्यूशी झुंज अपयशी, नगरमधील घटना

बचाव कार्यात अनेक अडथळे येत असताना पथकाने या चिमुकल्याला बाहेर देखील काढले. परंतू यात त्याला बाहेर काढण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Ahmednagar Borewell Boy Death

१५ फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आठ तासांपासून या चिमुकल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बचाव कार्यात अडथळा येत असूनही बचाव कार्य सुरूच ठेवून आठ तासानंतर या चिमुकल्याला बोअरवेलबाहेर काढण्यात अपयश आले खरे, पण तोपर्यंत या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.

ही दुर्दैवी घटना अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडली. सागर बुधा बरेला या चिमुकल्याचं नाव आहे. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या उसाच्या शेतात सागरचे पालक गट नंबर १४८ ऊसतोडीचं करत होते. हे कुटुंब मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात ऊसतोडणीच्या कामासाठी आले होते. काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतात खेळत असताना त्यांचा पाच वर्षाचा मुलगा सागर हा बोअरवेलमध्ये पडला.

बोअरवेलमध्ये जवळपास १५ फूट खोलीवर अडकला असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफचे पाच पथक घटनास्थळी दाखल झाले. समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. पण दहा फुटांवर मोठा मजबूत खडक लागला. या खडकाला फोडून खड्डा मोठा करण्यात खूप वेळ गेला. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याला बोअरवेलमधून काढण्यासाठी बचावकार्य सुरु होते.

बचाव कार्यात अनेक अडथळे येत असताना पथकाने या चिमुकल्याला बाहेर देखील काढले. परंतू यात त्याला बाहेर काढण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे रोजगारासाठी आलेल्या या ऊसतोड कामगार पालकावर आपल्या मुलाला गमावण्याची वेळ आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.