घरमहाराष्ट्रमुंबईला २०३० पर्यंत क्षयरोग व कुष्ठरोग मुक्त करण्याचे लक्ष्य

मुंबईला २०३० पर्यंत क्षयरोग व कुष्ठरोग मुक्त करण्याचे लक्ष्य

Subscribe

भारत सरकारने मुंबईला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त आणि सन २०३० पर्यंत कुष्ठरोग मुक्त करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेला दिले आहे.

मुंबई : भारत सरकारने मुंबईला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त आणि सन २०३० पर्यंत कुष्ठरोग मुक्त करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेला दिले आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मुंबईतील ९ लाख ८६ हजार घरांना पालिका आरोग्य खात्याचे २,८२९ चमू भेटी देऊन ‘सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम’ आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविणार आहे. (Aim to make Mumbai free of tuberculosis and leprosy by 2030)

या अभियानाच्या अंतर्गत आरोग्य विभागाचे चमू घरोघर जाऊन क्षयरोग व कुष्ठरोग याबाबत आरोग्य तपासणी करण्यासह जनजागृती देखील करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या चमुला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

- Advertisement -

४० लाख लोकांचीच होणार वैद्यकीय तपासणी

या अभियानाच्या अंतर्गत, पालिका आरोग्य खाते आपल्या चमूमार्फत ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ नागरिकांची तपासणी ही सार्वजनिक आरोग्य खात्याच्या २ हजार ८२९ चमुंद्वारे केली जाणार आहे. हे चमू सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत घरोघरी भेटी देणार आहेत. या प्रत्येक चमूत एक महिला, एक आरोग्य स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक अशा ३ व्यक्तिंचा समावेश असणार आहे. या भेटी दरम्यान एखाद्या घरातील कोणताही सदस्य उपलब्ध नसल्यास, सदर चमू त्या घराला घरातील सदस्यांच्या उपलब्धतेनुसार पुन्हा भेट देणार आहे.

- Advertisement -

१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, संध्याकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. प्राथमिक तपासणी दरम्यान आढळलेल्या अशा क्षयरोग संशयितांच्या थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी नियुक्त केंद्रांद्वारे मोफत केली जाणार आहे. तसेच या अभियानादरम्यान नव्याने आढळलेल्या रूग्णांची नोंदणी केली जाईल. अशा रुग्णांना त्यांच्या नजिकची पालिका आरोग्य केंद्रे, दवाखाने अथवा रूग्णालयांमध्ये पुढील तपासणी करण्यासह मोफत उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती क्षयरोग निर्मूलन विषयक दायित्व असणा-या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी यांनी दिली.

तसेच, कुष्ठरोग बाधित रूग्णांच्या त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा अगर चट्टे येणे, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे; तसेच तळहातावर वा तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे यासारखी लक्षणे आढळून येतात, अशी माहिती ऍक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमिता पेडणेकर यांनी दिली.


हेही वाचा – आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा; आदित्य ठाकरेंना भाजपाचे आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -