घरमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकरांच्या हटवादामुळे वंचितचा काडीमोड

प्रकाश आंबेडकरांच्या हटवादामुळे वंचितचा काडीमोड

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपात सन्मान राखला नाही, असा आरोप करत एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीत फूट पडली आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांवर हेकेखोरपणाचा आरोप करत माजी आमदार लक्ष्मण माने हे या आधीच वंचित आघाडीतून बाहेर पडले होते. त्यापाठोपाठ आता असाच आरोप करत एमआयएमनेही वंचित आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे वंचितसाठी हा फार मोठा फटका असल्याचे मानले जात आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणे ठरणार होती. पण आता एमआयएम बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणे बदलू शकतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच वंचित बहुजन आघाडी स्थापन करून काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेससाठी पर्याय निर्माण केला. या आघाडीमुळे दोन्ही काँग्रेसकडील दलित व मुस्लिम मतदार या आघाडीकडे वळाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचितने १८ लोकसभा मतदार संघांमध्ये तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवली. तर ९ जागांवर वंचितमुळे दोन्ही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता. लोकसभा निवडणुकीत या जनाधिकारामुळे वंचित बहुजन आघाडी ही दोन्ही काँग्रेसला पर्याय ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता असेल. आमची लढत या आघाडीविरुद्ध असेल, असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीनंतर मात्र वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘बी टीम’ म्हणूनही संबोधण्यात आले होते. या आघाडीमुळे सेना- भाजपला निवडणुकीत फायदा झाल्याचा आरोपी दोन्ही काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यानंतर मात्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठी आघाडी करायची असेल, तर काँग्रेसने १४४ जागा वंचितला सोडाव्यात, अशी मागणी केल्यामुळे विधानसभेतही वंचित आघाडी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत सामील न होता स्वबळावर लढणार असे स्पष्ट झाले होते. मात्र निवडणूक तोंडावर आली असताना वंचित आघाडीतच जागा वाटपाच्या मुद्यावरून टोकाचे मतभेद झाल्याने आता फूट पडली, त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेसाठी नव्याने राजकीय समीकरण निर्माण होणार आहे.

- Advertisement -

एमआयएमने मागितल्या ९८ जागा
‘एमआयएम’ला 98 जागांवर निवडणूक लढवायची होती, पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे एमआयएमने वंचित बहुजन आघाडीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार झाले.

आघाडी कायम असल्याचे आम्ही मानतो
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेसाठी १७ जागांची यादी पाठविलेली होती. पाठवलेल्या विधानसभेच्या जागांसाठी प्राथमिक चर्चा यांच्यासोबत सुरु आहे. पक्षाचे अध्यक्ष ओवैसी यांच्याकडून वंचित बहुजन आघाडी सोबतची युती तोडल्याचा संदेश किंवा तसे कोणतेही पत्र आमच्याकडे आलेले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी असे मानते की, एमआयएम पक्षासोबतची युती अजूनही कायम आहे. जोपर्यंत ओवैसी यांच्याकडून युती न होण्याबाबत कळविले जात नाही, तोपर्यंत युती कायम असल्याचे आम्ही मानतो.
– रतन बनसोडे, वंचित बहुजन आघाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -