Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रमराठवाडाEVM : ईव्हीएम शिवाय निवडणुका घ्या, भाजपची ताकद कळेल; MIMचे इम्तियाज जलील...

EVM : ईव्हीएम शिवाय निवडणुका घ्या, भाजपची ताकद कळेल; MIMचे इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र अजून सरकार स्थापन झाले नाही. तर दुसरीकडे विरोधकांकडून निवडणूक आयोगाची निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. महाविकास आघाडीनंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील पराभूत उमेदवार इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. लोकशाहीमध्ये लोकांना जे हवे आहे ते दिले पाहिजे. जर तुमच्यात हिंमत असेल तर एकदा ईव्हीएमशिवाय निवडणूक घेऊन दाखवा, तेव्हा तुमची ताकद कळेल, असे आव्हान इम्तियाज जलील यांनी भाजपला दिले आहे.

एआयएमआयएमचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सुनावणीसाठी आज ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. इम्तियाज जलील यांचा शेवटच्या फेरीत भाजपचे अतुल सावे यांच्याकडून दोन हजारांच्या फरकाने पराभव झाला.

- Advertisement -

एमआयएमचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीने अहवाल तयार केला आहे. मात्र तो तक्रारकर्त्यांना देण्यात आला नाही. हा अहवाल पाहून प्रशासनाने पुढील तारीख दिली आहे, यावर रोष व्यक्त करत जलील म्हणाले की, प्रशासनाने दैनंदिन सुनावणी घेतली तर तीन दिवसांत निर्णय घेतला जाऊ शकतो. जलील यांनी समितीकडे पैसे वाटपाचे व्हिडिओ सादर केले आहेत. पैशाचा वापर करुन मतदानाआधीच बोटांना शाई लावल्याचा प्रकार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात झाल्याचाही त्यांचा आरोप आहे. समितीने लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी जलील यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला, असा आरोप जलील यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे स्वतः पैसे घेऊन आले होते. ते कोणत्या हॉटेलमध्ये थांबले तेही मी सांगू शकतो, असे आव्हान जलील यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. जलील हे माजी खासदार असून लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे संदीपान भुमरेंनी त्यांचा पराभव केला होता.

पंतप्रधान मोदींचे ईव्हीएमवर प्रेम… 

महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात मोर्चा उघडला आहे. ईव्हीएमविरोधातील आंदोलनात महाविकास आघाडीसोबत राहणार का, यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, ईव्हीएमचे शिकार आम्ही देखील झालो आहे. लोकांना ईव्हीएम नको आहे तर तुम्ही त्यांच्यावर बळजबरी का करता, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ईव्हीएम वर खूप प्रेम असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले की, पूर्वी अनेक वर्ष बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या. लोकांचा विश्वास ईव्हीएम वर नाही. ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन बघा, मग तुमची ताकद कळेल, असे आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला दिले.

- Advertisement -

ईव्हीएमची लढाई सर्वोच्च न्यायालयातही सुरु आहे. त्यावर जलील म्हणाले की, मोदींना ईव्हीएम आवडते म्हणून कोर्टही त्यावर बोलायला तयार नाही. कोर्टाचा ईव्हीएममध्ये एवढा इंटरेस्ट का आहे, हे त्यांनी सांगावं. लोकशाही मध्ये लोकांना जे पाहिजे ते दिले पाहिजे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : EVM Vs Ballot paper : बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या… आज राजीनामा देतो; जितेंद्र आव्हाडांचे भाजपला आव्हान

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -