दक्षिण मुंबईमध्ये गणेश दर्शनासाठी बेस्ट उपक्रमाची वातानुकूलित हो हो बस सेवा

मुंबई : मुंबईसह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना सार्वजनिक गणपतीचे दर्शन सुलभरीतीने करता यावे, याकरिता बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित हो-हो बस उपलब्ध केली आहे.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे सण-उत्सव साजरे करण्यावर राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात जूनमध्ये सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सण-उत्सवावरील निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव मुंबई आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आता सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसत आहे. गणरायाच्या दर्शनासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये भाविकांच्या रांगा लागत आहेत. हेच ध्यानी घेऊन घेऊन बेस्ट प्रशासनाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत खुल्या दुमजली बस गाड्यांची सुविधा आधीच उपलब्ध करून दिलेली आहे.

गणेश भक्तांचा वाढता उत्साह आणि खुल्या दुमजली बस गाड्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून बेस्ट उपक्रमाने आता वातानुकूलित हो-हो बस सेवा गणेश भक्तांच्या सेवेकरीता दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस सेवा 8 सप्टेंबर 2022पर्यंत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर 25 मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या या बस मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा भायखळा रेल्वे स्थानक पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर रेल्वे स्थानक पूर्व, दादर टीटी या ठिकाणाहून वडाळा बस आगारापर्यंत चालवल्या जाणार आहेत.

या बस सेवेकरिता केवळ 60 रुपये इतक्या दराचा बसपास उपलब्ध असेल. तसेच साधी, मर्यादित तसेच वातानुकूलित बसगाडीतून प्रवासाकरिता हा पास वैध राहणार आहे. परंतु, खुल्या दुमजली बस गाडीसाठी वैध नसेल. ही बससेवा गणेश भक्तांना एका ठिकाणी उतरून गणेश दर्शनानंतर पुन्हा पुढील ठिकाणी गणेश दर्शनासाठी जाण्याकरिता उपलब्ध असणार आहे. अधिक माहिती करता प्रवाशांनी कृपया 180022750 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 022-24190117 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमांकडून करण्यात आले आहे.