घरमहाराष्ट्रAjit Pawar : अजित पवार यांच्याकडे आहे स्टॅम्प पेपरचा गठ्ठा! कारण...

Ajit Pawar : अजित पवार यांच्याकडे आहे स्टॅम्प पेपरचा गठ्ठा! कारण…

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा प्रशासनावर चांगला वचक आहे. एखादा सरकारी कागद मंत्रालयातील कुठल्या टेबलावरून दुसऱ्या कोणत्या टेबलावर जातो, हे अजितदादांना चांगले ठावूक आहे. त्यातच त्यांच्याबद्दल आता एक नवी चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्याकडे आता स्टॅम्प पेपरचा (stamp paper) गठ्ठा असल्याचे सांगितले जाते.

राज्यात केवळ महापालिकाच नव्हे तर, राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातही लोकसभा निवडणुकांमध्ये कोणता पक्ष किती जागा लढविणार, हा प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यासंदर्भातील महाविकास आघाडीची (MVA) भूमिका ‘अजितदादा शैली’त स्पष्ट केली. महाविकास आघाडी 100 टक्के एकत्र राहणार आहे, तू स्टॅम्प पेपर आण, मी लिहून देतो तुला. मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सह्या करूनही देतो, असे ते म्हणाले.

- Advertisement -

यापूर्वीही अजितदादांनी अनेक गोष्टी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी दर्शवली होती. 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील प्रचार सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य करताना, पवार कुटुंबीयांमध्ये कलह असल्याचा दावा केला होता. हा दावा फेटाळून लावताना अजित पवार यांनी पवार कुटुंबीयांमध्ये कलह नाही की भांडण नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

त्यानंतर 2021च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मणक्यांचे ऑपरेशन झाले होते. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या वेळी पत्रकारांनी, तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल वारंवार प्रश्न विचारला. त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे उत्तर दिले होते.

- Advertisement -

यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजित पवार यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्रांकडे (अजित पवार) आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते, असा टोला मनसेने लगावला होता.

त्यानंतर अजित पवार यांच्या नारजीची चर्चा सुरू झाली. विशेषत:, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर या चर्चेला हवा दिली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना, अजित पवार निघून गेले होते. त्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले. पण नंतर त्यांनी आपण वॉशरूमला गेलो होतो, असे सांगितले. शिवाय, मी नाराज नाही ते, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

आता महिन्याभरापूर्वी अजित पवार 2019च्या बहुचर्चित शपथविधीप्रमाणे पुन्हा एकदा ‘नॉट रिेचेबल’ झाले होते. यावरून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. पण त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही चर्चा खोटी असल्याचे सांगितले. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. हे आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ,’ असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पत्रकारांना केला होता.

आता एवढे स्टॅम्प पेपर त्यांनी बनवले नाहीत, हा भाग अलहिदा. पण कोणी आव्हान दिले असते तर त्यांनी एवढे स्टॅम्प पेपर तयार केले असते, हेही ते स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार होतील, एवढे नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -