घरमहाराष्ट्रशिक्षक अन् पदवीधर निवडणुकीत सुशिक्षित मतदारांकडून सरकारला चपराक : अजित पवार

शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीत सुशिक्षित मतदारांकडून सरकारला चपराक : अजित पवार

Subscribe

आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या अतुल भातखळकर यांनी अभिभाषणाबद्दल राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. भाजप आमदार संजय कुटे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यावर विरोधी पक्षाच्या वतीने अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आणि विधान परिषद निवडणूक निकालावरून सत्ताधारी पक्षाला चांगलेच चिमटे काढले.

मुंबईः राज्यातील सरकारला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी सरकारला अशी चपराक लावली की सारे नाउमेद झाले. गेल्या सहा -आठ महिन्यात तुम्ही दिवा लावला असता तर शिक्षक आणि पदवीधरांनी तुम्हाला निवडून दिले असते. पण त्यांनी तुम्हाला नाकारले, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु असून या सरकारची कामगिरी सुमार आहे, असा हल्लाही पवार यांनी सरकारवर केला.

- Advertisement -

आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या अतुल भातखळकर यांनी अभिभाषणाबद्दल राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. भाजप आमदार संजय कुटे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यावर विरोधी पक्षाच्या वतीने अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आणि विधान परिषद निवडणूक निकालावरून सत्ताधारी पक्षाला चांगलेच चिमटे काढले.

भाजपची हक्काची अमरावतीची जागा गेली. नागपूर शिक्षकमध्ये झाकली मूठ सव्वालाखाची म्हणून तिथे भाजपने पाठिंबा दिला. मराठवाड्यातही भाजपचा पराभव झाला. उत्तर महाराष्ट्रात भाजपला उमेदवार देता आला नाही. यांचा नेहमी दुसऱ्यावर डोळा, काँग्रेस, राष्ट्रवादीतून कुणी येते हे बघतात. अरे तुम्ही तुमचा तयार करा ना. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाची ही अवस्था आहे. त्यामुळे तुम्ही आत्मचिंतन करा, असा सल्ला पवार यांनी भाजपला दिला. कोकणात निवडून आलेले म्हात्रे हे कालपर्यंत शिवसेनेत होते. भाजपला स्वतःचा माणूस मिळाला नाही. आम्ही म्हात्रे यांना तिकीट दिले असते तर तुमच्या पाचही जागा गेल्या असत्या, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

शेतकरी, शेतमजूर, गरीब जनतेशी सरकारला देणंघेणं राहिलेले नाही. महिला आमदारांवर हल्ला होतो, सामान्य महिलांवर अत्याचार होतात. पण महिलांची सुरक्षा, कल्याणासंदर्भात सरकारकडे धोरण नाही. दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होत आहे. आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. भ्रष्टाचारी मंत्र्यांविरुध्द चौकशी करण्याची इच्छाशक्ती नाही. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्यांना मदतीचा हात देण्याची सरकारची तयारी नाही. कोरानानंतर आर्थिक स्थिती रुळावर येत असताना मंत्री खाण्यापिण्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी करत आहेत, अशी टीका करत अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावाला तीव्र विरोध केला.

शिवछत्रपतींच्या स्मारकासह अनेक स्मारकांचा विसर

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे जलपूजन करण्यात आले. मात्र या स्मारकाचे पुढे काहीही झाले नाही, त्याचा साधा उल्लेख सुध्दा अभिभाषणात करण्यात आला नाही. केवळ राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकांचे घाईत भूमीपूजन उरकण्यात आले. दादरच्या इंदू मिल येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख भाषणात नाही. तेही काम संथ आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा विसर सरकारला पडला आहे, अशी नाराजी पवार यांनी व्यक्त केली. तत्कालीन राज्यपाल यांच्यापासून मंत्री आणि सत्तारुढ आमदारांपर्यंत अनेकांनी राष्ट्रपुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करण्याचे सत्र अजूनही सुरु आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून तुकाराम महाराजांविषयी सुध्दा बागेश्वर बाबांकडून अपशब्द काढण्यात आले. महाराष्ट्र हे कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -