Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अजित पवार अन् जयंत पाटील वाद? असंतोषाचे पाणी मुरत असल्याची चर्चा

अजित पवार अन् जयंत पाटील वाद? असंतोषाचे पाणी मुरत असल्याची चर्चा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना, ‘मला सर्व नेत्यांचे फोन आले, पण अजित पवार यांचा फोन आला नाही,’ असे ते म्हणाले. यातूनच राष्ट्रवादीतील वाद पुन्हा धुमसत असल्याचे समोर आला आहे. त्यातही जयंत पाटील हे शरद पवार निष्ठावानांपैकी सर्वात वर असल्याचे सांगितले जाते.

वस्तुत:, 2019 साली झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील बेबनाव अनेकदा समोर आला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार यांचा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत शपथविधी झाला. कालांतराने सत्तास्थापनेचा हा प्रयोग फसला. पण याच्या 10-12 दिवसआधी नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीतून अचानक अजित पवार बाहेर पडले आणि गाडीत जाऊन बसले. पत्रकरांनी विचारताच, ‘बारामतीला जातोय,’ असे उत्तर दिले. पाठोपाठ जयंत पाटील आणि तेही गाडीत बसले. तथापि, पदावरून त्यावेळी बिनसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

विरोधी पक्षनेतेपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यावेळी देखील विरोधी पक्षनेतेपदी जयंत पाटील यांची निवड होईल, असा होरा जाणकारांचा होता. मात्र तिथे सुद्धा अजित पवार यांचे नाव पुढे आले. हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.

नवी दिल्लीत गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच अजित पवार निघून गेले होते. त्यानंतर अजित पवार यांनी आपण व़ॉशरूमला गेलो होतो, असे कारण दिले होते.

- Advertisement -

पवारांच्या राजीनाम्यावर पाटील भावूक अन् दादा…
शरद पवार यांच्या राजीनामाप्रकरणावरूनही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या परस्पर विरोधी भूमिका समोर आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावानेच ओळखला जातो. त्यामुळे त्यांनी असे अचानक बाजूला जाण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी असा निर्णय कोणालाही मान्य नाही, असे बोलत जयंत पाटील त्यावेळी भावूक झालेले पाहायला मिळाले. तर, शरद पवार यांच्या वयाचा विचार करता त्यांच्याशी तसेच सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण जबाबदारी द्यायची आहे. ते नेतृत्व शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असे अजित पवार म्हणाले होते.

ईडी चौकशीचे निमित्त
इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जयंत पाटील यांची ईडी चौकशी सुरू आहे. 12 मे रोजी त्यांना ईडीने पाचारण केले होते. त्यासंदर्भात अजितदादांना विचारले असता, याची मला माहिती नाही, माझा आणि जयंत पाटील यांचा अलीकडे कॉन्टॅक्ट झाला नाही, असे त्यांनी सांगितले. काल, सोमवारी ईडीने जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी केली. त्यावर, राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे मला फोन आले होते. पण अजित पवार यांचा फोन आला नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.
या चौकशी प्रकरणावरून अजित पवार यांनी, मी आतापर्यंत कोणाच्याही बाबतीत कोणतंही वक्तव्य केलेले नाही, असा खुलासा केला आहे. मात्र, तरीही, असंतोषाच्या ‘सिंचना’तून कुठेतरी पाणी मुरत आहे, असा काही जाणकारांचा अंदाज आहे.

- Advertisment -