घरताज्या घडामोडीअजित पवार-पार्थ पवार पुण्यात, दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता

अजित पवार-पार्थ पवार पुण्यात, दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारला जाहीर खडेबोल सुनावल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ झाली. कारण पार्थ पवार यांची नाराजी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जोडली गेलेली आहे. अजित पवार आज कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात आहेत. तसेच पार्थ पवार देखील पुणे जिल्ह्यात पोहोचलेले आहेत. त्यामुळे वडील-मुलामध्ये आज किंवा उद्या याच विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागच्या काही दिवसांपासून अजित पवार सातत्याने प्रत्येक आठवड्यात पुण्यात कोरोनाचा आढावा घेत आहेत. त्यासाठीच ते आज पु्ण्यात आले होते. तसेच उद्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री म्हणून अजित पवार पुणे येथे ध्वजारोहन करणार आहेत. त्यानंतर ते पार्थ पवार सोबत बारामती येथे जाणार असल्याची बातमी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिली आहे. बारामती येथे अजित पवारांचे कुटुंबीय एकत्रितपणे या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी आज दुपारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची बैठक झाली. धनंजय मुंडे यांच्या खात्याशी निगडीत काही प्रश्नांसंबंधी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. मात्र या बैठकीत पार्थ पवार बाबत चर्चा झाली का? याबाबत कोणताही दुजोरा मिळू शकला नाही.

शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर पार्थ पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. काल सिल्व्हर ओक येथे खासदार सुप्रिया सुळे यांची पार्थ पवारने भेट घेतली होती. या भेटीत सुळे यांनी पार्थची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात झालेली चर्चा कळू शकलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -