घरट्रेंडिंगविधानपरिषदेवर आता अजितदादांचा वचक

विधानपरिषदेवर आता अजितदादांचा वचक

Subscribe

अजित दादांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वात वजनदार मंत्री असतील तर ते आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. आता अजित पवारांचे वजन आणखी वाढले आहे. कारण विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज कामकाज सुरु होताच अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याआधी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. मात्र त्यांना बाजूला सारुन आता अजितदादांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिषदेत आता अजितदादांचा वचक असणार यात दुमत नाही.
वर्ष २०२० मध्ये विधानपरिषदेतील अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. जून २०२० मध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदार महाविकास आघाडीतर्फे निवडले जातील. मागच्या पाच वर्षात भाजपची सदस्य संख्या बर्‍यापैकी वाढलेली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारा नेता हवा होता. सुभाष देसाई यांच्या तुलनेत अजित पवार हे अधिक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभेत सभागृह नेते म्हणून मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांच्या जोडीला संपूर्ण मंत्रीमंडळ देखील आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते.

तालिका सभापतींची घोषणा

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभापतींनी सभागृहाच्या तालिका सभापतींचीही घोषणा केली. गोपीकिशन बाजोरिया, (शिवसेना),अनिल सोले (भाजप), अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), दत्तात्रय सावंत (शिक्षक आमदार) यांची निवड आता तालिका सभापतीपदी झाली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -