कसबा जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नका; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

संग्रहित छायाचित्र

अहमदनगरः कसबा जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्याला जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम करायचा आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला. पाथर्डी येथे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अजित पवार म्हणाले, कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागतंच. पण आपण एकत्र लढलो तर निश्चितचं त्यांचा पराभव करु. कसबापेठ मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत होता. तेथे त्यांना पराभूत केलं. जनता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात नाकारत आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र होऊनच निवडणुका जिंकायच्या आहेत.

कोणी ताम्रपत्र घेऊन जन्माला येत नाही. आम्ही आलो नाही. जे आता सत्तेत आहेत तेही ताम्रपत्र घेऊन जन्माला आलेले नाहीत. त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. आपण मात्र संमजसपणाची भूमिका घ्यायला हवी, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

एसटी सुरु नव्हती तेव्हा आम्ही वाहक चालकांचे पगार काढले आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीवर आर्थिक बोजा टाकून आम्ही एसटीच्या वाहक चालकांना पगार दिले. आताच्या सरकारची मात्र जाहिरातींवर उधळपट्टी सुरु आहे. वेतन मिळाले नाही म्हणून एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. तर सरकारकडून एसटीवर जाहिरात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. खराब एसटीवर ह्यांची जाहिरात आहे. खराब एसटीवर जाहिरात असल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी खराब एसटीवर जाहिरात लावणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. मीही अनेक वर्षे सत्तेत होतो. कोणी काही सांगितले तर आम्ही ऐकायचो. ह्यांना लगेच राग येतो. ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्याचे कुटुंब माझ्या नावानेच बोंबा मारत असेल ना. नंतर मी पुन्हा मंत्र्यांना भेटलो आणि अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची सुचना केली. एवढा राग बरा नाही, असा टोला अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. सत्ताधारी मात्र करु, एवढंच आश्वासन देतात. पोटनिवडणुकीनंतर जोशाने कामाला लागण्याचा सल्ला सत्ताधाऱ्यांनी कार्यकर्त्यंना दिल्या आहेत. हे जोशाने काम करणार मग आम्ही कसे काम करणार. आम्हीही जोशानेच काम करणार ना, असे अजित पवार यांनी सांगितले.