घरताज्या घडामोडीअजितदादांच्या दालनातच ठरली सचिन वाझेंच्या बदलीची स्क्रिप्ट, 'या' कारणामुळेच केली बदली

अजितदादांच्या दालनातच ठरली सचिन वाझेंच्या बदलीची स्क्रिप्ट, ‘या’ कारणामुळेच केली बदली

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात विरोधकांनी सभागृहात दोन दिवस जोरदार असा गोंधळ घातला. सचिन वाझेंवर जोवर निलंबनाची कारवाई होणार नाही, तोवर विधिमंडळाचे सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली होती. सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद हे मंगळवारी झालेल्या अधिवेशनाच्या कामकाजातही दिसले होते. या संपुर्ण प्रकरणात अजितदादांनी सचिन वाझे यांच्या बदलीच्या कारवाईचा संपुर्ण किस्सा अधिवेशनाचे सूप वाजताना पत्रकारांना सांगितला. अधिवेशाच्या समारोपाला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री यांनी कोणत्या परिस्थितीत सचिन वाझे यांच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागला या गोष्टीचा उलघडा केला आहे. एकुणच या संपुर्ण प्रकरणात सरकारला बॅकफुकटला जाव लागल्याचीच एक प्रकारे स्पष्टोक्ती अजितदादांच्या या उत्तरातून दिसून आली.

अजितदादांनी सांगितला सचिन वाझे यांच्या बदलीचा किस्सा…

अजितदादा पत्रकार परिषदेत म्हणाले की, आज बुधवारी सकाळी मी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यासोबत माझ्या दालनामध्ये बसलो होतो. आजच्या दिवसभरामध्ये अतिशय महत्वाचे कामकाज होते. त्यामुळेच आम्ही चर्चेसाठी बसलो होतो. अनेक आमदारांना अर्थसंकल्पावर बोलायचे होते. तसेच आपल्या भागातील समस्या मांडण्यासाठी अनेक आमदारांना बोलायचे असते. काही कागदपत्रे मांडायची असतात. तसेच काही विषयावर राज्य सरकारचे स्पष्टीकरण द्यायचे होते. म्हणूनच आजच्या दिवसाचे कामकाज चालणे गरजेचे होते, अशी आमच्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती. आजच्या दिवशी गिलेटीनही ५.३० वाजता असल्यामुळेच कामकाज नियोजित वेळेत होणे महत्वाचे होते अशी आमच्यात चर्चा झाली. त्याचवेळी माझ्या दालनात विरोधी पक्षातले दोन नेते आल्याची माहिती अजितदादा यांनी दिली. मला भेटायला विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हे दोघेही आले. त्यांनी माझ्याकडे सांगितले की, जर सचिन वाझे यांच्यावर कारवाई झाली नाही तर, दोन्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे स्पष्टीकरण दिले. पण आजच्या दिवसाचे कामकाज पाहता विधानसभेत कामकाज होणे महत्वाचे होते. म्हणूनच आम्हीही सरकार म्हणून काहीतरी समंजस भूमिका घ्यायला हवी असा या प्रकरणात तोडगा काढला. या प्रकरणात सचिन वाझे यांच्या बदलीची कारवाई करून विरोधकही शांत होतील आणि दिवसाचे महत्वाचे कामकाजही होईल अशाच पद्धतीने आम्ही ही कारवाई केली असल्याचे अजितदादा म्हणाले. दोन्ही सभागृहाचे कामकाज चालावे म्हणूनच आम्ही सरकार म्हणून ही भूमिका घेतली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री यांनी हे निवेदन देण्याचे ठरविले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधान परिषदेत एका प्रश्नावरील उत्तर होते. या प्रश्नाला उत्तर देतानाच अनिल देशमुख हे सचिन वाझे यांच्यावरील कारवाईची भूमिका सांगतील असे ठरले. अनिल देशमुख विधान परिषदेत गेल्यानंतर एका प्रश्नावर उत्तर देताना सचिन वाझे यांच्या बदलीची माहिती सभागृहाला दिली. आम्ही सचिन वाझे यांची बदली (गुन्हे गुप्तवार्ता विभाग) सीआयुमधून करत आहोत असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिले. तर विधानसभेत संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती एका निवेदनाद्वारे विधानसभेत दिली. विधानपरिषदेत विरोधी पक्षाचे समाधान न झाल्यानेच विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभात्याग केला.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -