पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आल्यापासून विरोधकांनी एकच मुद्दा लावून धरला आहे, तो म्हणजे ‘ईव्हीएम’. याच ‘ईव्हीएम’विरोधात ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव हे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहे. त्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी अनेक राजकीय पदाधिकारी त्यांना भेट देत आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेही बाबा आढाव यांच्या भेटीला गेले. यावेळी अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. (Ajit Pawar comments on the assembly election results after meeting Baba Adhav)
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना बाबा आढव यांनी लोकसभेनंतर पाच महिन्यांत इतक कसा बदल होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्नावर अजित पवार यांनी म्हटले की, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. बाबा आढव यांनी मांडलेल्या भूमिकेतील काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, तर काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला लक्षात आणून दिलेले मुद्दे त्यांनी मान्य केले होते. मागील लोकसभा निवडणुकीत आमच्या कमी जागा आल्या. त्यावेळी आम्ही किंवा महायुतीतील कोणीही ईव्हीएमबाबत बोललो नाही. पण आता विधानसभेत आम्हाला यश मिळाल्यावर हा प्रश्न विचारला जात आहे. यावेळी त्यांनी पाच महिन्यांतील बदलाबद्दल बारामतीचे उदाहरण दिले.
हेही वाचा – Ajit Pawar : जनतेचाच कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न
अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्या. आता विधानसभेत जनतेने मला मतदान दिले. जनतेने आधीच म्हटले होते लोकसभेत सुप्रिया सुळेंना आणि विधानसभेत अजित पवारांना मतदान करणार आहे. त्यानुसार राज्यभरात मतदान झाले. लोकसभेत महाविकास आघाडीला आणि विधानसभेत महायुतीला जनतेने मतदान केले. खरं तर जनतेचा कौल पाच महिन्यांत बदलला त्याला आम्ही तरी काय करणार? असा थेट प्रश्न अजित पवार यांनी बाबा आढव यांच्यासमोर विचारला.
लाडकी बहीण योजनेवरील आरोपावर अजितदादांचे प्रत्युत्तर
दरम्यान, बाबा आढाव यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करताना मतदारांना 1500 रुपयांचे प्रलोभन दिल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, सरकारी योजना आताच आल्या नाहीत. संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून काँग्रेस लोकांना पैसे देते. आम्ही आता महिलांना 1500 रुपये देत आहोत, परंतु महाविकास आघाडीने 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत केजरीवाल यांनी अनेक गोष्टी मोफत दिल्या आहेत. बाबा आढाव तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
हेही वाचा – Thackeray Brothers : निवडणुकीत पराभव झाल्याने…; ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत दानवेंचे सूचक वक्तव्य