…तर मुख्यमंत्री आजारी पडले नसते, अजित पवारांची मिश्कील टिप्पणी

ajit pawar

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. शिंदे सरकार स्थापन होऊन एक महिला लोटला आहे. तरीसुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. दरम्यान, बंड पुकारल्यापासून शिंदे यांचे दौरे सुरुच आहेत. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला शिंदेंना दिला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तार केला असता तर मुख्यमंत्री आजारी पडले नसते,अशी मिश्कील टिप्पणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

बारामती तालुक्यातील सायबाचीवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित पवार बोलत होते. आज एक महिना उलटून गेला तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे काहीही म्हटलं तरी राज्यातील विकासकामं ठप्प झाली आहेत. त्यांच्यावर इतका भार आलाय की, मुख्यमंत्री आजारी पडत आहेत. कुणीच आजारी पडू नये. मी चांगल्या भावनेने बोलतोय, राजकारण करत नाही. परंतु तोच भार जर मुख्यमंत्र्यांनी बाकीच्या ४०-४२ लोकांचं मंत्रिमंडळ केलं असतं, तर कामाची वाटणी झाली असती, असं अजित पवार म्हणाले.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारी अधिकारी व्यक्तीच जर नियम मोडत असेल तर कसे चालेल. असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंत होत असणाऱ्या दौऱ्यांबाबत अजित पवार यांनी टीका केली आहे. जेव्हा आपण पदावर असतो तेव्हा आपल्याला नियम मोडून चालत नाही. रात्रीच्या वेळी दहाच्या पुढे लाउडस्पीकर बंद करायला सांगतात. मात्र, मुख्यमंत्री फिरत असताना रात्री एक दोन वाजेपर्यंत स्पीकर चालू असतात. पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारेच नियम मोडत असतील तर पोलीस तरी काय करणार?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

बंड केलेल्या आमदारांनाही तुम्हाला मंत्री करतो, असे सांगितले असावे. म्हणून मंत्रिमंडळविस्तार होत नसेल. त्यामुळे कोणाला मंत्री, कोणाला राज्यमंत्री तर भाजपच्याही १०६ आमदारांना वाटतं की, आपल्यालाही मंत्रिपद मिळायला पाहिजे. एक तर त्यांना मुख्यमंत्रीपद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले की न सांगितलेलं बरं, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांवर खोचक टीका केली.


हेही वाचा : प्रभाग रचनेचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली नाही, उदय सामंत यांचा खुलासा