मला चिठ्ठ्या द्यायची हिंमत आहे का? अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी साताऱ्याच्या एका सभेतून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मला चिठ्ठी देण्याचं कुणी धाडस करेल का?, मुख्यमंत्र्यांनी एखादी नोट घेऊन पॉइंटनुसार मुद्दे मांडावेत. कारण तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. त्यांना त्याचं काही तारतम्यच नाही. काही त्यांच्यासोबत घडलं की, ते दोन-तीन दिवस साताऱ्यात राहतात आणि शेती करतात. स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?, तीन दिवसांत फक्त मुख्यमंत्र्यांनी ६५ फाईल्स काढल्या. आम्ही दोन ते तीन तासांत ६५ फाइल्स काढतो. ही त्यांची अवस्था आहे, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

 सत्तेचा माज आम्ही होऊ दिला नाही

सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊ दिला नाही. सत्तेची मस्ती डोक्यात शिरून दिली नाही. त्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांना सन्मानानंच वागवलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही कॅबिनेट चालवायचो. तसेच प्रशासनाकडे देखील एक कार्यकर्ता म्हणून कामं घेऊन जायचो. मी उपमुख्यमंत्री असताना जमिनीवर पाय ठेवून जायचो. परंतु तशाप्रकारे आताच्या सरकारमध्ये दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले.

खालच्या पातळीचे शब्द हे मंत्र्यांकडून वापरले जातात

आज मंत्री तर अक्षरश: कुणालाच विचारत नाहीत. मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं बाजारात फिरतायत. खालच्या पातळीचे शब्द हे मंत्र्यांकडून वापरले जातात. महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करण्याचं काम हे राज्यपालांसह राज्यकर्त्यांनी केलं. कुणीही त्यांना आवरलं नाही. आपण मोर्चे काढत आंदोलनं देखील केली. यापूर्वी असं कधी घडलं होतं का?, परंतु यांच्या काळात या सर्व गोष्टी घडल्या, असं अजित पवार म्हणाले.

नवीन प्रकल्प आणण्याची धमक यांच्यातही नाही

माझ्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत. प्रकल्पही परराज्यात गेले, यांनी ते प्रकल्प थांबवण्यासाठी काहीही केलेलं नाही. नवीन प्रकल्प आणण्याची धमक यांच्यातही नाही. ७५ हजार मुला-मुलांना नोकऱ्या लावणार असं राज्य सरकारनं सांगितलं होतं?, त्याचं काय झालं. काहीही नाही. त्या मंत्रालयात बसायला कुणीही तयार नाही. अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला असून त्यांना मदत पुरवली जात नाही. आमचं सरकार असतं तर ७ कोटीपर्यंत आमदार निधी गेला असता, असं पवार म्हणाले.

जनतेच्या पैशातून यांची जाहिरातबाजी सुरू

जनतेच्या पैशातून यांची जाहिरातबाजी सुरू आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून जाहिरातबाजी केली जात आहे. तुम्ही त्यांची प्रसिद्धी करत नाहीत. पण यांना तर प्रसिद्धीचा मोह लागलाय. मग तुमच्याच पैशातून यांची जाहिरातबाजी केली जाते. जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतात. बेस्ट बसेसवर यांचेच फोटो असतात. अशा प्रकारचा कारभार आम्ही कधीच पाहिला नव्हता. मी चार वेळा अर्थमंत्री होतो. परंतु गरजेच्या वेळीच जाहिरातबाजीवर खर्च करायचो. ९ वर्ष जयंत पाटील होते. एक वर्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील होते, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : अन्यायाविरोधात वाचा फोडायलाच हवी म्हणून.., सीमा भागातील मतदारांना राज ठाकरेंचं आवाहन