शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग; अजित पवारांचा आरोप

यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. वेगवेगळ्या घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केलाय.

Ajit-Pawar

अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असाही आरोप अजित पवारांनी केलाय. राज्यात गेल्या २ दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत, अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे, मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत विधानसभेत गोंधळ घातला. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारचा निषेध करत विरोधी पक्षाने सभागृहातून सभात्याग केला.

अवकाळी पावसाने व गारपीठीने राज्यातला शेतकरी संकटात आला आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले असताना राज्याचे मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या भावना बोथट आहेत. सरकारच्यावतीने सभागृहात करण्यात आलेले निवेदन अपुरे आहे, अनेक नुकसानग्रस्त भागांचा उल्लेख या निवेदनात नाही. राज्यातला शेतकरी हतबल असताना सरकारने बघू, करु अशी उत्तरे न देता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.