माझी परिस्थिती थोडी खुशी, थोडी गम वाली; अजित पवारांनी पोटनिवडणुकीबाबत व्यक्त केले मत

गेल्या २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला आहे. महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा या मतदारसंघात विजय झाला आहे.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या २८ वर्षांच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. चिंचवडचा निकाल अद्यापही स्पष्ट आकडेवारीनुसार समोर आलेला नसला तरी राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीला या जागेवर पराभूत व्हावे लागले आहे, असे मत विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवारांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “माझी परिस्थिती थोडी ख़ुशी थोडी गम वाली आहे,” असे मत व्यक्त केले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, कसबा आणि चिंचवडमध्ये मी प्रचार करत होतो. चिंचवडमध्ये प्रचार करत असताना मला काही माहिती येत होती. राहुल कलाटे यांना सत्ताधारी कशी मदत करत होते, याची मला माहिती येत होती. सत्ताधाऱ्यांनी कलाटे यांना मदत केल्यामुळेच आमचा पराभव झाला. मी राहुल कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं अनेकवेळा आवाहन केलं होतं आणि आता नानाला संधी देऊ असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही, ज्यामुळे हा पराभव झाला आहे.

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राहुल कलाटे आणि नाना काटे यांची मते पाहिली तर ती मते भाजपच्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहे. बंडखोरी झाली नसती तर हे चित्रं वेगळं दिसलं असतं. मागच्यावेळी कलाटे यांना लाखभर मते मिळाली. पण यावेळी त्यांना ती मते मिळाली नाही. पण त्यांनी स्वत:ची मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असेही अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

यापुढे आता जागा वाटप करताना ते व्यवस्थित केले पाहिजे. महाविकास आघाडीने व्यवस्थित जागा वाटप केलं पाहिजे. आतापासूनच तयारी केली पाहिजे. तरच पुढे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल. यावेळी त्यांनी कसब्यातील विजयाचं स्वागत केलं. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याचे अजित पवार म्हणाले.

पहिल्यांदाच कोणतातरी मुख्यमंत्री मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसला होता. मुख्यमंत्र्यांना विचारलं तर मुख्यमंत्री म्हणाले की, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे म्हणून लोकांची भेट घेत आहे, पण सर्वसामान्यांना भेटूनही कसब्यातील भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे, असा टोला यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

हेही वाचा – पोटनिवडणुकीचा परिणाम राजकारणावर होत नसतो – संजय शिरसाट

शिंदे-फडणवीस यांनी कसब्यात नेतृत्व केलं तरीही त्यांचा पराभव झाला. गिरीश बापट यांची तब्येत बरी नव्हती. नाकाला ऑक्सिजन असतानाही त्यांना प्रचारात आणलं. आरोग्यापेक्षा भाजपने निवडणूक महत्त्वाची समजली. ही माणुसकी आहे का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो केले. मोठ मोठ्या सभा घेतल्या तरीही भाजपचा पराभव झाला, असेही अजित पवार म्हणाले