कोल्हापूर : मनसेला भाजपने ऑफर दिली होती, असा खुलासा करत राज ठाकरे यांनी राजकीय वर्तुळातील मोठे विधान केले. ज्यानंतर राजकारणात आता विविध चर्चा करण्यात येत आहेत. ऑफर असली तरी भाजपा अजित पवारांचे काय करते हे मला बघायचे आहे. त्यानंतरच मी निर्णय घेईन, असे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांना भाजपने ऑफर दिली असली तरी माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणत अजित पवारांनी पत्रकारांवर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. (Ajit Pawar expressed his opinion on BJP’s offer to Raj Thackeray)
हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांच्या भेटीसोबतचा अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले –
कोल्हापूरात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हे राज ठाकरे बोलले आहेत, मी सांगितलेले नाही. राज ठाकरेंना भाजपाने ऑफर दिली असेल, पण त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, मी त्यावर बोलणार नाही. भाजपाने ज्याला ऑफर दिली तो त्यांचा आणि भाजपाचा विषय आहे. मी कशाला त्यात नाक खुपसू.
तर, यावेळी नको ते प्रश्न विचारण्यावरून त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना सुनावले आहे. असले काही तरी विचारू नका. माझ्याशी संबंधित प्रश्न किंवा राज्य सरकारशी संबंधित असणारे प्रश्न जरूर विचारा, मी त्याची उत्तर देईन, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. अजित पवार यांनी यावेळी नवाब मलिक यांच्याविषयी देखील भाष्यकेले आहे.
दीड वर्षानंतर तुरुंगातून दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, माझी आणि नवाब मलिकांची भेट झालेली नाही. मी कालच कोल्हापूरला आलो आहे. फोनवर अशी चर्चा होऊ शकत नाही. अटक झालेल्या व्यक्तिशी अशाप्रकारे फोनवर बोलता येत नाही. त्यांना सध्या वैद्यकीय कारणाने तुरुंगातून बाहेर सोडले आहे. त्यातून ते बाहेर आल्यावर त्यांना भेटता येईल.