घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी कायम राहणार अजित पवार यांचा ठाम विश्वास

महाविकास आघाडी कायम राहणार अजित पवार यांचा ठाम विश्वास

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीची एकजूट कायम राहणार असून हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी आघाडीच्या ऐक्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. एक पक्ष असला तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. त्यामुळे आता आघाडीबाबत जो काही निर्णय होईल तो या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. या निर्णयाची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षी होऊ घातलेली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केला आहे, मात्र आघाडीत जागा वाटपाचा मुद्दा अतिशय कळीचा आहे. जागा वाटपावरून आघाडीत मतभेद निर्माण होऊन आघाडी फुटेल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी आघाडीच्या ऐक्याबाबतची शंका दूर केली.

- Advertisement -

आमच्या पक्षासंदर्भात आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढू नका, असेही पवार म्हणाले.

केंद्रीय आणि राज्याच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करण्याचा अधिकार असतो. बोलावल्यानंतर व्यक्ती चौकशीला संपूर्ण सहकार्य करतात. नुकतेच जयंत पाटील यांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना पुरवण्या मागण्यांवेळी सत्ताधारी आमदारांनी काय सांगितले हे रेकॉर्डवर आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्रीपद भोगून भाजपमध्ये गेल्यावर आता आम्हाला शांत झोप लागते, असे हा माजी मंत्री म्हणतो. तीच गोष्ट एका खासदाराने सांगलीत सांगितली, तर एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आमच्याकडे निरमा वॉशिंग मशिन आहे, असे वक्तव्य केले होते. वास्तविक एकीकडे सत्ताधारी पक्षाचे लोक कर नाही तर डर कशाला, असे विधान करीत आहेत, मात्र द्वेष भावनेतून तसेच राजकीय सूडबुद्धीने कुणाला चौकशीला बोलावण्यात येऊ नये, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्‍याच्या कारनाम्यावर स्पष्टपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी मलिक यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता त्याच आरोपांची चौकशी सीबीआय करीत असून ते अधिकारी फार स्वच्छ आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता सीबीआयने लोकांसमोर सत्य मांडले आहे, असेही अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

लोकसभेच्या जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटप करताना गेल्या वेळी जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षांकडेच राहतील, असेही अजित पवार त्यांनी सांगितले, तर अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोडण्याबाबत आघाडीत एकमत असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा आमच्याकडेच राहाव्यात, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून महाविकास आघाडीत उर्वरित २५ लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा होणार आहे. तसेच महाविकास आघाडीत लोकसभेसाठी प्रत्येकी १६ जागांचे कोणतेही सूत्र ठरलेले नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -